लंडनमध्ये श्री गणरायाची दहा वर्षापासून होतेय स्थापना

नारायणगाव : (किरण वाजगे)

सातासमुद्रापलीकडे म्हणजेच लंडन येथे २०१३ साली नारायणगावचे भूमिपुत्र सागर कुलकर्णी यांनी राजे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळाची स्थापना केली होती. गेल्या दहा वर्षापासून लंडन येथील होन्स्ले शहरात ते आपल्या भारतीय बांधवांसह सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे.

याशिवाय दिवाळी गुढीपाडवा रंगपंचमी संक्रांत असे भारतीय सण देखील मंडळाच्या वतीने धुमधडाक्यात साजरे केले जातात. या सर्व उत्सवांना अर्थातच मराठी स्पर्श असतो. या निमित्ताने लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठी भारतीय तसेच भारतीय उपखंडातील नेपाळ, बांगलादेश या देशांमधील हिंदू बांधवही एकत्र येऊन अत्यंत उत्साहात हे सर्व सण साजरे करतात. यातून भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली असल्याचे पहायला मिळते.

परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांना एकत्र येता येते तसेच पाश्चिमात्य देशातील नागरिकांनाही भारतीय संस्कृतीबद्दल खूप आकर्षण असल्याने तेही या उत्सवांमध्ये सहभागी होतात. परदेशातच जन्माला आलेल्या व तेथेच स्थायिक होत असलेल्या भारतीयांच्या पुढील पिढीलाही अशा आपल्या हिंदू संस्कृतीची व थोर महापुरुषांची माहिती मिळत असल्याने सागर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक वेळा कौतुक देखील झाले आहे.

यावर्षी साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवामध्ये सागर कुलकर्णी यांच्यासह अतुल पवार, मोनिका पवार, अवधूत पवार, योगेश गोडसे, प्रियांका गोडसे, ओवी गोडसे, आकाश आवारी, अनुजा आवारी, अरिन आवारी, आन्वी आवारी, विशाल नानवकर, अमिता नानवकर, कृषीव नानवकर, अनुज जयस्वाल, रितिका जयस्वाल, समर्थ जयस्वाल, विजय ठाकूर, अश्विनी ठाकूर, रणवीर ठाकूर, राकेश राणे, कीर्ती राणे, ध्रुव राणे, कमलेश राठोड, कनिष्का राठोड, अन्विता राठोड, अनुप गायकवाड, साक्षी गायकवाड व यश गायकवाड आदींनी यांनी सहभाग घेतला.

Previous articleतंटामुक्ती अध्यक्षच झाला तडीपार
Next articleसंशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया-डॉ.एन.एस.गायकवाड