नारायणगावात भर बाजारपेठेत मंदिराची दानपेटी फोडली

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव येथील शंभर वर्षांपूर्वीच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम व चांदीच्या पादुका अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या.

नारायणगाव येथील पूर्ववेशीजवळ भर बाजारपेठेत असलेल्या तसेच शंभर वर्षांपासून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडली. व सुमारे ५० ते ६० हजार रुपये चोरून नेले. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मीनारायण मूर्ती समोर असलेल्या चांदीच्या पादुका देखील अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. ही घटना रविवार दिनांक १० रोजी मध्यरात्री ते सोमवार दिनांक अकरा रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली अशी माहिती लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसाबे व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे यांनी दिली.

याबाबत नारायणगाव पोलीसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान मंदिरात, समोरच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या, लाला बँकेच्या व परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी देखील धनगरवाडी येथील मोहटादेवी मंदिराची दानपेटी फोडून सुमारे पन्नास हजार रुपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. तसेच नारायणगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या गावातील अनेक दुकानांची व बंद असलेल्या फ्लॅटची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी मोठी रक्कम व मौल्यवान ऐवज यापूर्वी अनेकदा लांबवला आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसां पुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे.

दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी झाल्यानंतर घटनास्थळी नारायणगावचे उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दिवटे, सुनील दिवटे, प्रणव भुसारी, तुषार दिवटे आदींनी भेट दिली.

Previous articleविद्युत ट्रान्सफार्मर चोरणारी टोळी यवत पोलिसांनी केली जेरबंद; 3 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त
Next articleहेल्प फॉऊडेशनच्या वतीने जऊळके बु येथील ठाकरवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप