विद्युत ट्रान्सफार्मर चोरणारी टोळी यवत पोलिसांनी केली जेरबंद; 3 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

योगेश राऊत, पाटस

पुणे जिल्ह्यासह यवत परिसरात विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या अट्टल टोळीला यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दत्ता अशोक शिंदे (वय २८, रा. राहु, ता. दौंड), विशाल मनोहर सोनवणे (वय-३० रा. सासवड, ता. पुरंदर), राज मच्छिंद्र वानखडे (वय- १९ ) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (वय-२९, रा. दोघेही केडगाव, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून यवत पोलिसांनी ३ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. ०२) अज्ञात चोरट्यांनी १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास यवत पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक करीत असताना शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड व अक्षय यादव यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, रोहित्र चोरी करणारी टोळी हि राहू (ता. दौंड) येथील शिवाजी चौक येथे येणार आहे.

त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून संशयित एका चारचाकी गाडीतून जाताना दिसून आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर घटनेबाबत चौकशी केली असता त्यांनी आणखी साथीदारासमवेत राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर या परिसरातील २८ ठिकाणची रोहित्राच्या आतील तारा चोरून नेल्याची कबुली दिली.

दरम्यान, चोरी केलेला माल हा आमजद पाषामिया खान (वय ४०, रा. साईनगर, कोंढवा, ता. हवेली) याला विकल्याची माहिती आरोपींनी यावेळी दिली. पोलिसांनी सदर आरोपींकडून १ लाख ७६ हजार ७५० रुपये किंमतीच्या ३५० किलो तांब्याच्या तारा, गुन्हयात वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या, एक दुचाकी, व चार मोबाईल असा ३ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची रिमांड कोठडी ठोठावली आहे.

सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरू गायकवाड, गणेश कर्चे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, रामदास जगताप, सुनील कोळी, पोलीस शिपाई प्रविण चौधर, मारूती बाराते, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त “विठू माऊली माझी अभंगवाणी” कार्यक्रमाचे आयोजन
Next articleनारायणगावात भर बाजारपेठेत मंदिराची दानपेटी फोडली