नारायणगाव पोलिसांनी लागोपाठ झालेल्या दोन खूनांचा आठ दिवसात लावला छडा

किरण वाजगे

नारायणगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये आठ दिवसांपूर्वी लागोपाठ झालेल्या दोन खूनांच्या तपासाचा छडा लावण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. यामुळे दोन्ही खुनाचा तपास यशस्वी लावणाऱ्या व आरोपींना अटक करणाऱ्या नारायणगाव पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १२ मे ) रोजी सकाळी दहा वाजण्यापूर्वी वारूळवाडी येथील जयहिंद टायर्स या दुकानात काम करणारा कामगार मोहम्मद नब्बास फुल मोहम्मद (वय ३५ वर्ष, रा. बिहार) याचा मृतदेह दुकानावर असलेल्या खोलीत आढळून आला होता. त्याच्या सोबत राहत असलेला परप्रांतीय कामगार कुमार हा तेथून पसार झाला होता. हे दोन्ही कामगार बिहार राज्यातील असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने बिहार येथे जाऊन तसेच संबंधित रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे थेट बिहार वरून या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे आरोपी कुमार उर्फ सुरेंद्र सहदेव राजाकी (वय ४२ राहणार सहदेव बैठा, जिल्हा मुजफ्फरपुर, राज्य बिहार) यास त्याच्या गावातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ओतूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आकाश शेळके, नारायणगावचे उपनिरीक्षक सनिल धनवे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर नारायणगाव चे हवलदार दिनेश साबळे, संतोष साळुंखे, शैलेश वाघमारे यांनी या यशस्वी कामगिरीत सहभाग घेतला.

यापूर्वी ( दि.११) रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या संभाजी उर्फ गोविंद गायकवाड याच्या खुनाचा तपास देखील अवघ्या दोन दिवसात लावण्यात नारायणगाव पोलिसांना यश मिळाले होते. तसेच हॉटेल कपिल बियर बार मध्ये दि. १० मे रोजी झालेल्या गोळीबार मध्ये सहभागी असलेले आरोपी देखील नारायणगाव पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वापी गुजरात व नवी मुंबई येथून तात्काळ शोधून काढले आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल नारायणगाव पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleस्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीमध्ये सातत्य हा यशाचा मूलमंत्र – राहुल भागवत पोलिस उपनिरिक्षक
Next articleटिळेकरवाडी येथे खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्र संपन्न ; कृषि विभागाच्या अंतर्गत स्तुत्य उपक्रम