आगामी उन्हाळी सुटयांसाठी एमटीडीसी पर्यटकांना देणार निखळ आनंदाबरोबरच विविध सोयी-सवलती

पुणे- आगामी मे महीन्याच्या सुटयांसाठी महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ आखणी करीत असुन पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी आणि सवलती देणार आहे.

कोरोना नंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट नव्या दमाने खुली झाली असुन महामंडळाचे कर्मचारी आदरातिथ्य आणि विविध उपक्रमांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेवुन तयार झाले आहेत. पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठया प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असुन तब्बल 2 वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद दिला आहे. आगामी पर्यटक हंगाम आणि सुटटीसाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे.

आगामी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही सुटयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्‍यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट”चीही सुरवात दि. 01/10/2021 पासुन सुरु केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत.

शाळांना मिळणाऱ्या सुटयांमुळे आणि आगामी उन्हाळी सुटटीचा हंगाम द्विगुणित करण्यासाठी एमटीडीसी कडुन पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.

नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. महामंडळाची जल पर्यटन केंद्रे नाशिक, लोनावळा (कार्ला), गाण्पतीपतीपुळे आणि तारकर्ली येथे असुन या ठिकाणी कडक उन्हाळयामध्ये जलपर्यटनासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.

दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. या हंगामामध्ये पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेस ची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपारीक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच मिळाली आहे. महामंडळाच्या पानशेत आणि कार्ला येथील पर्यटक निवासांमध्ये गेल्या आठवडयात डेस्टिनेशन वेडींग उत्तमरित्या पार पाडण्यात आली. यावेळी अगदी पहाटे 2.30 वा विवाहाच्या विधीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडुन तयारी करुन देण्यात आली आणि हे डेस्टीनेशन वेउींग उत्साहात पार पडले. महामंडळाकडुन अशा डेस्टिनेशन वेडींगसाठी खास सवलती आणि पॅकेजीस जाहीर करण्यात येणार असुन त्यावर सध्या कार्यवाही करण्यात येत आहे. महाबळेश्वर येथे उद्योग संचालनालयाच्या वार्षिक नियोजन ची कॉन्फरन्स सध्या पार पडत असुन अशा कॉन्फरन्स साठी मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरु असुन www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी “कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट” सह नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत.”
दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे’

Previous articleआयपीएस अधिकाऱ्यांनी झाडाखाली भरवली शाळा ; शेवराई संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम
Next articleधामणीच्या जाधव पाटलांच्या रावण बैलाला मिळाली विक्रमी किंमत