कानसे गावात श्री काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पट्ट्यातील निसर्गरम्य वातावरण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यपदस्पर्शाने पावन झालेल्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीच्या तीरावर वसलेल्या कानसे या विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा यात्रामहोत्सव नुकताच उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यात्रेदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, कालाप्रसाद , रामनवमी उत्सव, मनोरंजनात्मक कार्यक्रम, कुस्त्यांचा जंगी आखाडा, आदी कार्यक्रम लक्षवेधी ठरले होते.

कारोना जागतिक महामारीमुळे सर्वच धार्मिक उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा-महोत्सवांवरही गदा आली होती.

तथापी सरकारने यंदा कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर कानसे गावात भावभक्तिचा मळा फुलविण्यासाठी काळभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी उपस्थित श्रोत्यांना समुपदेशन केले. या सप्ताहादरम्यान दानशूर व्यक्तींनी मसालेवडी, पुरण-पोळी, आमरस, आदी स्वादिष्ट पक्वान्नांद्वारे अन्नदान केले. शनिवारी दुर्गाष्टमीदिनी ग्रामदैवत काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्ताने हारतुरे, कालाप्रसाद, किर्तन, भजन, काठी नाचवत निघणारी दंडवते, रात्री भैरवनाथांची पालखी, मनोरंजनात्मक कार्यक्रम, रविवारी दुपारी राम जन्मोत्सव, जंगी कुस्त्यांचा आखाडा, आदी नानाविध कार्यक्रमांनी भैरवनाथांच्या यात्रा महोत्सवामुळे कानसे गाव आणि पंचक्रोशीत भावभक्तीचा जणू मळा फुलला होता. अत्यंत भावपूर्ण वातावरणात कानसे गावात पार पडलेल्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांची यात्रा महोत्सवासाठी काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, काळभैरवनाथ धर्मदाय संस्था, काळभैरवनाथ ग्रामविकास मंडळ, तसेच वाड्या-वस्त्यांतील मंडळांसह गाव आणि पंचक्रोशीतील तरूण कार्यकर्ते, महिला वर्ग आणि अबाल-वृद्धांनी अथक परिश्रम घेतले होते.

Previous articleकवठे येमाईत येमाई च्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा भव्य आखाडा.
Next articleसविधान मानवी जीवनासाठी पथदर्शक- प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव