ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात सामाजिक अंतर्भाव महत्वाचा — सौ.सुनेत्रा पवार

पुणे

“ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात सामाजिक अंतर्भाव महत्वाचा आहे. या विकासातून अनेक कुटुंबे उभी राहतात, त्यांना रोजगार प्राप्त होतो. ग्रामीण भागातील भूसंपदा जैवविविधता व जनसंपदाचा तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा विचार घेऊनच पर्यावरण पूरक शाश्वत विकास केला जाऊ शकतो. या विकासातून शिक्षणाचा दर्जा उंचावतो. लोकांचे जीवनमान उंचावते यासाठी ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. याच विचार सरणीतून आम्ही ग्रामीण भागाचा विकास साधू शकलो. निर्मल आणि इकोफ्रेंडली गाव, पाणीपुरवठा योजना घनकचरा व्यवस्थापन दुष्काळ निवारण या सारख्या अनेक योजना राबविल्या त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.” असे उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या व बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांनी काढले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या सदिच्छा भेटीतील कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे होते. डॉ. हिरे यांच्या शुभहस्ते सौ. सुनेत्रा पवार यांच्या सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव श्री. राजेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे यांनी केले.

महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती देतानाच महाविद्यालयाने केलेल्या गुणात्मक विकासाची माहिती दिली. डॉ. प्रकाश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त, संचालक, विविध शाखेतील प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव येथे हजरत गणपीर बाबांच्या संदल उत्सवाचे आयोजन
Next articleकवठे व्हाॅलीबाॅल लीगमध्ये विजय बगाटे सेव्हन स्टार संघ विजेता