स्कॉटिश कड्यावरून क्रांतीकारकांना वंदन

राजगुरूनगर -हुतात्मा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोर्यात आरोहणासाठी अति कठीण श्रेणीत गणला जाणारा ५५० फूटी स्कॉटिश कडा सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या देशभक्त गिर्यारोहकांनी थोर क्रांतीकारकांना वंदन करीत “भारत माता की जय”, “वंदे मातरम” या घोषणा देत केलेली ही साहसी मोहीम देशाच्या संरक्षणार्थ सेवा देणाऱ्या जिगरबाज भारतीय जवानांना समर्पित केली.

या मोहीमेसाठी गिर्यारोहक राजगुरूनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरू वाडा आणि हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृती शिल्पा समोर नतमस्तक होऊन रवाना झाले.

या मोहिमेची सुरवात निरगुडपाडा गाव, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथून झाली. दोन तासांची पायपीट करून कड्याच्या पायथ्याला पोहचून शिव गर्जना देऊन आरोहणास सुरवात झाली.

खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची चिकाटीने मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. पहिला ७० फूटी टप्पा हा ८० अंशातील आहे. त्या नंतर पुढील आरोहण मार्ग हा अंगावर येणारी उभी भिंतच. पुढे ७० फूटी टप्पा पार केल्यावर बहिर्गोल खडक आरोहण करणे कठीण जाते. येथून पुढे कधी दोन खडकांच्या मधून अंग चोरून तर कधी बाहेर येऊन आरोहण करावे लागते. हा १०० फूटी टप्पा पार केल्यावर अजून ७० फूटी अरुंद भिंतीमधील टप्पा पार केल्यावर शेवटचा ३० फूटी मातीचा घसरडा टप्पा गडावर घेऊन जातो.

छातीत धडकी भरावी अश्या सरळसोट कड्याचे रांगडे रूप, उष्णतेची लाट असल्याने मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारी खडतर मोहीम, ९० अंशातील ५५० फूट आरोहण मार्ग, चुकीला माफी नाही असे हे ठिकाण, काळजाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, कोणत्याही क्षणी कोसळणारे दगड (लूज रॉक्स) अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंके, अक्षय ठाकरे, मंदार चौधरी, पूजा साळुंके, तेजस जाधव, अक्षय कातोरे , सचिन भांड, शंकर पाटील, अरुण पवार, रवि कोतवाल, हेमंत पाटील, महेश दौंडकर, राहुल जाधव, शुभम चौधरी, माधव गोसावी आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleकिवळे येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न : तरुणांसह महिलांचा सहभाग उल्लेखनीय
Next articleदौंडमध्ये स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन