सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठवणार – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बंगळुरू येथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन परतताना महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांना दिले.

बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर दोषींवर कारवाई करावी आणि शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने ४७ दिवस तुरुंगात डांबून ठेवले. त्यामुळे सीमाभागात प्रचंड संतापाची भावना होती. त्यामुळे बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून मानवंदना देऊन परतणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमचे महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले.

विशेष म्हणजे रात्री १२.०० च्या सुमारास पुण्याकडे परतत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा सत्कार करताना सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा व अडचणींचा पाढा वाचला. या सत्काराला उत्तर देताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडूसकर, अमित देसाई, पियुष हवल, सागर पाटील, बळवंत शिंदोलकर, विकास कलगड, प्रकाश मरगाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पवार साहेबांवर सीमाबांधवाचे विशेष प्रेम

महाराष्ट्र एकीकरण समितीचा सत्कार स्वीकारून पुण्याच्या दिशेने निघाल्यानंतर रात्री १२.३० वाजता एका टोलनाक्याजवळ पुन्हा काही सीमावासीय मराठी बांधवांनी थांबवले व सत्कार केला. सोबतच सीमाप्रश्नाबाबतचे गाऱ्हाणेही मांडले. ते कळकळीने बोलताना म्हणाले की, ‘आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. पवार साहेबांचा अधिकार मोठा आहे. कोर्टात सीमाप्रश्नावर निर्णय होईल तेव्हा होईल. पण आपण पवार साहेबांना आमच्या वतीने विनंती करा की, त्यांनी पंतप्रधान मोदींना यात लक्ष घालून तोडगा काढण्याबाबत सूचना करावी.’

ज्या विश्वासाने ते पवार साहेबांबद्दल बोलत होते, त्यावरून आपली समस्या केवळ पवार साहेबच सोडवू शकतात याची त्यांना खात्री असल्याचे स्पष्ट दिसत होते. या निमित्ताने सीमावासियांचा आदरणीय पवार साहेबांवरील प्रेम व विश्वास बघून माझ्याही मनात पवार साहेबांविषयीचा आदर द्विगुणित झाला.

Previous articleवीज कंपनी प्रशासना सोबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मुख्य कार्यालाय प्रकाशगड येथे सकारात्मक चर्चा
Next articleचंद्रकांत भवारी नेट परीक्षा उत्तीर्ण