कान्हेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत रंगला स्ट्रॉबेरी महोत्सव : सह्याद्री प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

राजगुरूनगर

स्ट्रॉबेरीचे फळ चित्रात किंवा टीव्हीवर पाहिले होते, पुस्तकातही वाचले होते, मात्र ते कधी चाखायला मिळाले नव्हते. ते फळ ढीगाने समोर आले आणि विद्यार्थ्यांनी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. निमित्त होते येथील सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचाने कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील जिल्हापरिषद शाळेत आयोजित केलेल्या
स्ट्रॉबेरी महोत्सवाचे.

प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या महोत्सवात गावच्या मुख्य तसेच वाडीतील भागशाळेचे पंचाऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्ट्रॉबेरीच्या ढीगातील स्वतःच्या हाताने हवे तेवढी फळे घेऊन खान्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते. पहिल्यांदाच आपल्या दोन्हीही हातात बसेल इतकी स्ट्रॉबेरी घेऊन खाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद पसरला होता.

“विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सण समारंभाच्या निमित्ताने नेहमी ग्रामस्थ किंवा पाहुण्यांकडून चॉकलेट, बिस्कीट किंवा इतर फळे असा खाऊ मिळत असतो. आज मिळालेला खाऊ मुलांचे कुतूहल जागृत करणारा होता. स्ट्रॉबेरीचे पीक थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाते, हे पुस्तकात वाचलेले किंवा आम्ही शिकवलेले विद्यार्थ्यांना थोडेबहुत माहीत होते. मात्र, त्यांना ते आज मनसोक्त खायलाही मिळाले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे,’ अशी भावना मुख्याध्यापक सुरेश नाईकरे व शंकर बुरसे यांनी यावेळी व्यक्त केली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल म्हणाले, “प्रतिष्ठान वेळोवेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांसह इतरही घटकांसाठी विविध उपक्रम राबवीत असते. कोरोना काळात प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून गावातील गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा उपलब्ध करून दिला होता. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेली दोन वर्षात उपक्रम राबविता आला नव्हता. एक अनोखा उपक्रम म्हणून स्ट्रॉबेरी महोत्सव भरवून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे.’

प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगेश खाडे, पिंटू पवार, सुजीत थोरात, विलास कोबल, विनोद कोबल, कलामंचाच्या प्रमुख डॉ. अश्विनी शेंडे, योगेश गोंधळे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी सोमनाथ शिंदे यांनी या महोत्सवाचे संयोजन केले.

Previous articleपोवाडा,पाळणा आणि बाल मावळ्यांच्या उत्साहाने शिवजयंती साजरी
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा -योगेश पाटे