शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील होदीगेरे येथील समाधीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले दर्शन

पुणे

स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील होदीगेरे (Hodigere) येथील समाधीसमोर आज खासदार डॉ. अमोल कोल्हे नतमस्तक झाले. त्याचबरोबर तातडीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्राद्वारे समाधी स्मारकाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून होदीगेरे (Hodigere) येथील शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होती. या पोस्टची तातडीने दखल घेत काल कागल येथील शिवजयंती उत्सवातील व्याख्यान संपल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शहाजीराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कर्नाटकमधील दावणगिरी जिल्ह्यातील होदीगेरे (Hodigere) येथील समाधीवर नतमस्तक होऊन स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहाजीराजे समाधी स्मारक समितीचे अध्यक्ष मल्लेश्वर शिंदे, प्रफुल्ल तावरे, डॉ. घन:श्याम राव, आदी सहकारी उपस्थित होते.

होदीगेरी परिसरात नरभक्षक वाघांनी आदिवासींवर हल्ला केल्याचे कळताच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या शहाजीराजांचा २३ जानेवारी १६६४ रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला तिथे छोट्याशा जागेत शहाजीराजांचे समाधी स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र अतिशय छोट्या जागेत दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या समाधी स्थळावर शहाजीराजांचे चांगले स्मारक उभे राहिल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा भूमिकेतून खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून स्मारकाचा विकास आराखडा तयार करून त्याच्या उभारणीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, स्वराज्याची संकल्पना मांडणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेले त्यांचे वडील महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित असणे हे अतिशय क्लेशदायक बाब आहे. खरं तरं छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच शहाजीराजांचे कार्यही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे या समाधी स्मारकाचा नियोजनबद्ध विकास करुन एक भव्य स्मारक उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करणार असून भारतीय पुरातत्त्व विभागाललाही या स्मारकासाठी सहकार्य करण्याची विनंती करणार असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, याखेरीज खासदार स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करुन देता येईल का याचीही चाचपणी करणार आहे. आवश्यकता भासल्यास आपण शिवप्रेमी जनतेच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याचा प्रयत्न करु असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleआत्मदहनाच्या इशाऱ्याची घेतली वीज कंपनी प्रशासनाने दखल :सचिन मेंगाळे
Next articleआप्पासाहेब डोंबे यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसपदी निवड :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र