कोयत्याचा धाक दाखवून मोटार चालकाला लुबाडले

उरुळी कांचन

कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी गाडीचे काचेवर दगडी मारुन जबदस्तीने ५ हजार रुपये काढुन घेवून फिर्यादी व त्यांचे आईस शिवीगाळ करून निघून गेलेल्या चारपैकी तिघांना गुन्हा दाखल झालेनंतर पोलीसांनी ४ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

 याप्रकरणी अजिंक्य अजित वाघ (वय ३०,  रा. श्रीकृष्ण अपार्टमेन्ट, गंगापुरी, वाई, ता. वाई, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संतोष गौतम चव्हाण (वय २५), लक्ष्मण चंद्रकांत धारवडकर (वय २३), दीपक श्रीरंग सकट (वय १९, तिघेही रा. देवाची उरुळी, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेवून दिवे घाटात पळून गेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे

१२ फेब्रुवारी रोजी आई अपर्णा यांचेसमवेत अल्टो गाडी क्रमांक एम एच ११ सीडब्ल्यु ००६० मधून वाई वरुन दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खराडी पुणे येथे लहान भाऊ अपूर्व याचेकडे आलो होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारांस ते तिघे अल्टो गाडीतुन खराडी पुणे येथून वाईकडे निघाले.

 रात्री ८ -३० वाजण्याच्या सुमारांस ते सासवड रोडने वाई येथे जात असताना गिरमे वडापाव समोरुन दोन दुचाकी वरून चारजण आले. व कार थांबवुन बाजुला घेण्यास सांगीतले. अजिंक्य यांनी कार बाजुला घेताच दोघांनी काचेवर दगड फेकुन मारले. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेले दोघे गाडीजवळ आले. त्यापैकी एकाचे हातात कोयता होता. त्याने कोयत्याचा धाक दाखवुन अजिंक्य यांना शिवीगाळ करुन त्यांचे शर्टचे वरील खिशातील ५ हजार रुपये  जबरदस्तीने काढून घेतले. तर एकाने दगडाने काच फोडुन आईस शिवीगाळ करुन गाडीत काय ठेवले आहे असे विचारले. त्यानंतर अजिंक्य व अपूर्व हे दोघे गाडीचे खाली उतरताच ते चौघे दुचाकीवरून तेथुन पळुन गेले.

 रात्री १२ – ३० वाजण्याच्या सुमारांस गुन्हा दाखल करण्यात आला. यादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार शंकर नेवसे, विनोद कांबळे, सागर वणवे,  हेमंत कामठे, अभिजित टिळेकर, मंगेश साळवे हे पहाटे ३ – ३० वाजण्याच्या सुमारांस गस्त घालत दिवे घाटातील तिसरे वळणावर आले असता दोन दुचाकीवर चार जण संशयास्पदरित्या जाताना दिसले. पोलीसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी गाडी न थांववता पुढे नेली.  त्यावेळी त्यांचे वर्णन वरिल गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचे मिळते जुळते असल्याचे पोलीसांची खात्री झाली. त्यांना पुन्हा थांबवले असता ते गाडी सोडून पळून जाऊ लागले. म्हणून पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून चव्हाण, धारवडकर,  सकट या तिघांना शिताफीने पकडले तर एकजण अंधाराचा फायदा घेत दिवे घाटात पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर हे करत आहेत.

Previous articleतीन सराईत गुन्हेगारांना अटक करून दिड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त : लोणी काळभोर पोलीसांची कामगिरी
Next articleपेडगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटन