सय्यदनगरचे रेल्वे फाटक खुले करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना वेग

उरुळी कांचन

हडपसर – सय्यदनगर-ससाणेनगर येथील रेल्वे फाटक क्र. ७ वाहतुकीसाठी खुले करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांच्या मागणीनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना रीतसर पत्र पाठवून हे रेल्वे फाटक खुले करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

सय्यदनगर-ससाणेनगर येथील रेल्वे फाटक क्र.७ रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुळात या रेल्वे फाटकाला पर्यायी तयार केलेले अंडरपास या भागातील वाहतुकीची घनता लक्षात घेता पुरेसे नाहीत. त्यामुळे मूळ रेल्वे फाटक क्र. ७ वरील उड्डाणपूल अथवा अंडरपासचे काम होईपर्यंत फाटक बंद करु नये अशी नागरिकांच्या मागणीनुसार खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

या चर्चेत दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून बांधलेल्या अंडरपासला जोडणारा रस्ता खासगी मालकीचा असून या रस्त्याचे भूसंपादन झालेले नाही. लोकप्रतिनिधींनी विनंती केल्यानंतर जमीन मालकांनी हा रस्ता मुख्य फाटकावरील उड्डाणपूल अथवा अंडरपासचे काम होईपर्यंत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मूळ फाटकावरील काम सुरू न करता फाटक बंद केल्यास खासगी जागेतील रस्ता बंद करण्याचा इशारा खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर श्रीमती शर्मा यांनी जिल्हा प्रशासनाने फाटक खुले करण्याचा प्रस्ताव दिल्यास रेल्वे मुख्यालयाकडे शिफारसीसह सादर करण्याचे आश्वासन दिले होते.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा करून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे रेल्वे फाटक क्र.७ वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना रीतसर पत्र पाठवून फाटक खुले करण्याचे निर्देश दिले आहेत.

Previous articleBREKING NEWS – वाघोलीत ९ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू
Next articleपुणे ग्रामिण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे राष्ट्रीय खेळाडू अजय घुले यांच्या कार्याचा गौरव