BREKING NEWS – वाघोलीत ९ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू

गणेश सातव,वाघोली,पुणे

वाघोली येथील भैरवनाथ मंदिर तलावात पाय घसरुन पडल्याने एका ९ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला.सोनाक्षी विजय राखपसरे( वय-९ वर्षे,रा.बुरुंजआळी,इंदिरानगर) असे मृत्युमुखी पावलेल्या मुलीचे नाव असून,ती आज दुपारी ३ च्या सुमारास आपली मोठी बहिण सुनीता हिच्यासोबत भैरवनाथ मंदिर तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती.मोठी बहिण तलावालगतच्या पायरीवर कपडे धूवत असताना सोनाक्षी हि लघुशंकेसाठी बाजूला जात असताना निसरड्या पायरीवरुन घसरुन तलावात पडली.

यावेळी पडलेल्या लहान बहिणीला वाचवण्यासाठी मोठ्या बहिणीने घाबरून आरडाओरडा केला.परंतु,परिसरात आजुबाजुला बसलेले नागरिक व कपडे धुण्यासाठी असलेल्या महिला घाबरून पुढे गेल्या नाहीत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताचं वाघोली उपस्थानक आधिकारी विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालक,जवान संदीप शेळके,अक्षय बागल, मुस्ताक तडवी, चेतन खमसे, विकास पालवे,ओम पाटील,अभिजित दराडे यांनी तलावात उतरुन मुलीचा शोध घेतला.यावेळी लोणीकंद पोलीस व स्थानिक ग्रामस्थ ही शोधकार्यात सहभागी झाले होते.

शोधकार्य सुरु असताना साधारण ४ तासाच्या प्रयत्नाअंती संध्याकाळी ६.३० वाजता मुलीचा मृतदेह हाती लागला.

मागील दिड-दोन वर्षापूर्वी याच तलावात वाघोली ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचारी महिलेचा,तीच्या मुलाचा व या दोघांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा सुरक्षिततेच्या अभावी मृत्यू झाला होता.त्यानंतर संबंधित प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते.परंतु ते केले नसल्याने आज पुन्हा दुर्दैवाने हि घटना घडली व त्यानंतर वाघोलीत तलाव परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Previous articleडॉ.वर्षा गुंजाळ यांची जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती
Next articleसय्यदनगरचे रेल्वे फाटक खुले करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना वेग