मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला-अजित पवार

अमोल भोसले,पुणे

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

देखणं व्यक्तिमत्त्व… अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले असेही अजित पवार म्हणाले.

सीमा आणि रमेश देव यांचे वास्तवातले तसेच पडद्यावरचे दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होते. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Previous articleस्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय जगताप, विजय कांचन, धिरज जाधव यांचा बहिर्जी नाईक पुरस्काराने गौरव
Next articleसंजीवन समाधी म्हणजे चित्त व प्राण पंचमहाभूतात विलीन करुण चीरकाळ चैतन्य निर्माण करणे- जेष्ठ समाजसेवक,प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे