उरुळी कांचन मधील अवैध सावकाराचा फास आवळला

उरुळी कांचन

बेकायदा सावकारी व्यवसायाचे आधारे लोकांना वेठीस धरुन पैसे जमविणा-यास लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद केले आहे. एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

             याप्रकरणी स्वप्नील राजाराम कांचन ( वय ३०,रा. आश्रम रोड, परिवर्तन सोसायटी, उरूळी कांचन, ता हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास रामदास कटके (वय ३०, रा. आष्टापुर माळवाडी, ता. हवेली) यांनी स्वप्नील कांचन त्याचे वडील राजाराम आबुराव कांचन (दोघे रा. ऊरुळी कांचन), प्रशांत गोते (रा. भिवरी ता. हवेली) व इतर दोन ते तीन अनोळखी इसम यांनी आपआपसात संगनमत करुन सन २०१६ ते आजअखेर स्वप्नील कांचन यांचेकडुन व्याजाने घेतलेल्या सात लाख रुपयांचे व्याज म्हणुन फिर्यादीकडुन रोख ४ लाख ६० हजार रुपये रोख घेतले आहेत.

               यानंतरही कटके यांना स्वप्निल कांचन, प्रशांत गोते व त्यांचे सोबतचे दोन अनोळखी साथीदार यांचे साथीने बळजबरीने कांचन त्यांचे गाडीत टाकुन लोणी काळभोर हवेली क्र. ६, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये घेऊन जाऊन कटके व त्यांचे कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचेकडील कर्जाचे बेकायदेशीर व्याजापोटी त्यांची शिंदवणे, ता. हवेली येथील १८ गुंठे जमीन प्रशांत गोते यांचे नावावर बळजबरीने करुन घेऊन कटके यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतरही अजुनही व्याजाचे पैसे शिल्लक आहे असे सांगुन त्यांची ऊर्वरीत वडीलोपार्जीत जमीन कर्जाचे बेकायदेशीर व्याजापोटी त्यांचे नावे करुन देण्याकरीता कटके यांना तसेच कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जाच करत असुन व्याज वसुलीसाठी सतत तगादा लावुन त्रास देत असल्याने त्यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार केल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम व भादवि कलमा नुसार वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

              गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तात्काळ बेकायदा सावकारांचे राहते घर व ऑफिसची झडती घेणेकरीता मोकाशी यांनी पोलीसांची तीन पथके तयार करुन धडक कारवाई करुन स्वप्निल कांचन याचे राहते घरातुन ५७ लाख ३८ हजार ५४० रुपये रोख रक्कम व  रु. ४८ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागीने अशी एकुण १ कोटी ६ लाखाची बेहिशोबी मालमत्ता तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त केले असुन स्वप्निल कांचन यास अटक केली. न्यायालयाने त्यास १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदरचे आरोपींकडुन अजुन कोणी फसविले गेले असेल तर लोकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान पोलीसांनी केले आहे.

          सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे डॉ. नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर नम्रता पाटील,सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, इतर अधिकारी व अंमलदार यांनी केला असुन पुढील तपास व पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करीत आहेत.

Previous articleजेनेरिकर्ट एनएव्ही माध्यमातून ग्राहकांना गेली पाच वर्षे चांगली सेवा देण्याचा प्रयत्न- सुनिल जगताप
Next articleनथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश