चाकणमध्ये दुकानदाराकडे महिन्याला १० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या बोगस पत्रकारासह, पुरवठा अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक

चाकण-गॅस शेगडी दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराकडे गॅस सिलिंडर टाकी कशी काय ठेवली, असे म्हणत दुकानदारावर कारवाई करण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्या बोगस पुरवठा अधिकारी व पत्रकारावर महाळुंगे पोलिसांनी कारवाई करत त्या दोघांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे (वय ५७, रा. मोशी), संदीप नानासाहेब बोर्डे (वय ३५, रा. तळवडे) अशी अटक केलेल्या तोतया अधिकारी व पत्रकाराचे नाव आहे. या बाबत प्रशांत माणिक पायगुडे (वय २५, रा. महाळुगे) यांनी महाळुगे पोलिसांत तक्रार दिली आहे.

खेड तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी व पत्रकार असल्याचे सांगून हे दोघे कारवाईची धमकी देऊन कारवाई करायची नसेल तर प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता चालू कर, अशी धमकी देत होते. तसेच तडजोड करून पाच हजार रुपये घेऊन जात होते. या बाबत महाळुगेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांना माहिती मिळाली की दुकानदाराकडे पैसे मागण्यासाठी जाणारा एक व्यक्ती पूर्वी पत्रकार होता, त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुकानदाराला या व्यक्ती पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मंगळवारी (दि. १८) आरोपी हे फिर्यादी पायगुडे यांच्या दुकानात आले आणि खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानात जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलिस हवालदार राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, ज्ञानेश्वर आटोळे, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, श्रीधन इचके यांनी केली.

Previous articleविहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यांना वनविभागाने दिले जीवदान
Next articleदौंड नगरपरिषद तर्फे पर्यावरण पूरक मकरसंक्रांत साजरी