विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यांना वनविभागाने दिले जीवदान

आंबेगाव- तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे ३ ते ४ महिने वयाच्या विहिरीत पडलेल्या दोन बिबटयाच्या बछड्यांना वनविभागाने बिबट रेस्क्यू टीम व ग्रामस्थांच्या साहाय्याने विहिरीतून वरती काढून जीवदान दिले आहे. अशी माहिती मंचरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टाव्हरेवाडी येथे बाबुराव रामचंद्र शिंदे यांच्या विहिरीत रविवारी ( ता .१६ ) रोजी रात्री दोन बिबट्याचे बछडे पडले होते सोमवारी ( ता. १७ ) रोजी शेतकरी आकाश सत्यवान टाव्हरे हा विहिरीवरील कृषी पंप चालू करण्यासाठी गेले असता विहिरीच्या कपारी वर दोन बछडे बसलेले दिसले . या बाबत त्यांनी सरपंच उत्तम टाव्हरे यांना कळवले असता सरपंच यांनी वन विभागाला कळविले.

वन विभागाच्या वतीने या बछड्यांना ग्रामस्थ,बिबट रेस्क्यू टीम विलास भोर, मनोज तळेकर ,अतुल साबळे, मिलिंद टेमकर, वनपाल विजय वेलकर,वनरक्षक एम.बि.मुंडकर, वनरक्षक सी.एस.शिवशरण यांनी सुखरूप विहिरीतून बाहेर काढून रेस्क्यू करून अवसरी घाट वनोद्यान येथे नेले आहे.

आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून विहिरीत पडलेले बछडे तीन ते चार महिने वयाचे आहेत आईपासून बछड्यांची ताटातूट झाल्याने वाघीण चवताळण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन स्मिता राजहंस वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांनी केले आहे.

Previous articleनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक
Next articleचाकणमध्ये दुकानदाराकडे महिन्याला १० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या बोगस पत्रकारासह, पुरवठा अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक