दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

निरगुडसर- आंबेगाव तालुक्यातील लौकी गावच्या हद्दीत चांडोली रोडवर दुचाकीवर जाणाऱ्या तीन तरुणांचा बिबट्याने पाटलाग करत दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ( दि.७)रोजी रात्री ७:३० च्या दरम्यान घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेला तरुण प्रतिक तुकाराम थिटे ( रा.लौकी ता.आंबेगाव पुणे ) हा जखमी झाला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक थिटे, निलेश थोरात, हरीश पडवळ हे कळंब येथून कामावरून घरी जात असताना निलेश थोरात हे गाडी चालवत होते.हे तिघेजण लौकी गावच्या हद्दीत लौकी चांडोली रोडने जात असताना अचानक बिबट्याने त्यांचा पाठलाग सुरू केला व गाडीवर बसलेल्या तरुणांवर हल्ला केला या हल्ल्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या प्रतिक थिटे याच्या पायाला बिबट्याने पज्जा मारल्याने तो जखमी झाला आहे. बिबट्याचा हल्ला होताच या तरुणांनी गाडी सुसाट पळवली असता त्यांचा जीव वाचला आहे. तसेच गाडी पळवल्या नंतरही बिबट्याने काही अंतर त्यांचा पाठलाग केला. पुढे जाऊन त्यांनी याबाबत गावातील लोकांना माहिती दिली. त्यानंतर प्रतीक थिटे यास उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक यांची भेट घेऊन चौकशी केली आहे.

दरम्यान लौकी गावच्या हद्दीत या अगोदरही बिबट्याने अनेकदा माणसांवर हल्ले केले असून पाळीव जनावरे, कुत्रे यांच्यावर नेहमीच हल्ले होत असल्याचे सरपंच संदेश थोरात यांनी सांगितले आहे. वनविभागाने या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावावा व बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ करत आहे.

Previous articleदारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून आखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे यवत पोलीस स्टेशनला निवेदन
Next articleदोंदे गावात आवास प्लस योजनेचा शालिनी कडु यांच्या हस्ते शुभारंभ