एचडीएफसी बँकेतील क्रेडिट कार्ड डिपारमेंटच्या त्रासाला कंटाळून वीटभट्टी व्यावसायिकाची आत्महत्या

मावळ- क्रेडिट कार्डचे थकलेले पैसे भरण्यासाठी वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड डिपारमेंट यांच्या त्रासाला कंटाळून चिखलसे ता. मावळ येथील वीटभट्टी व्यावसायिकाने जंगलात जाऊन साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपण एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. याबाबतची फिर्याद विकास तान्हाजी काजळे ( वय ३० रा. चिखलसे ता. मावळ जिल्हा पुणे ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रकाश तान्हाजी काजळे ( वय 31 रा. चिखलसे ता. मावळ जिल्हा पुणे ) एचडीएफसी बँकेकडील क्रेडिट कार्डचे बिल थकले होते.ते भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे न्हवते मात्र क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट वारंवार मागणी करत होते. तसेच त्याच्या मित्रांनाही फोन करून तुमच्या मित्राला क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सांगा या बाबत त्याला निरोप द्या असे वारंवार सांगत होते. त्यानंतर दिनांक 28/12/2021 रोजी एचडीएफसी बँकेचे चौघे जण फिर्यादी यांच्या घरी येऊन तुमचा भाऊ कोठे आहे त्याला क्रेडिट कार्डचे बिल भरायला सांगा असे म्हणून फिर्यादी यांच्या ओट्यावर बसून राहिले होते.त्यावेळी फिर्यादी यांनी मी माझ्या भावाला तुमचे बिल देण्यास सांगतो तुम्ही जा असे म्हणाला असता आम्हाला बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर ते फिर्यादीच्या भावाची वाट पाहत दिवसभर थांबले होते व सायंकाळी निघून गेले.

प्रकाश दिवसभर व रात्रीही घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी दि.30 रोजी फिर्यादी यांनी प्रकाश बेपत्ता झाले असल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्याचा शोध घेत असताना त्यांची मोटरसायकल चिखलसे गावच्या हद्दीत केदारनाथ मंदिराच्या जवळ आढळून आली त्यावेळी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांनी प्रकाश काजळे याचा आजूबाजूच्या जंगलात शोध घेतला असता त्याला पवनानगर रोडच्या कडेला जंगलात झाडाला प्रकाश याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकाश काजळे याला खाली उतरले असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय माझ्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते हे लोक खूप त्रास देत होते अशा आशयाची चिठ्ठी सापडली आहे.

Previous articleधक्कादायक! पुण्यात २९ वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार
Next articleजरेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक जरे ,तर व्हा. चेअरमनपदी नामदेव जरे यांची निवड