सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून शिरोलीच्या उपसरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात जल्लोषात केला वाढदिवस साजरा

राजगुरुनगर– गावात कोरोनाचे दहा रुग्ण असल्यामुळे गाव कंटेन्टमेंट झोनमध्ये असताना उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये घडली आहे.

याप्रकरणी माजी उपसरपंचासह सदस्यांनी या उपसरपंचांच्या विरोधात गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच १८८ कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते.

जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा केला. त्याचे फोटो व‌ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. वाढदिवस साजरा केला त्यावेळी काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थित असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थिगळे, विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत, उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेवर काय कारवाई करणार हा गावात चर्चेचा विषय बनला आहे.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच वाढदिवस साजरा करत असताना ग्रामसेवक सुध्दा उपस्थित असल्याचे समोर आल्याने अशा बेजबाबदार ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत

Previous articleअनोख्या पद्धतीने वारजे परिसरात भाजप महिला पदाधिकार्यांनी रक्षाबंधन केले साजरे
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याच्या कामाला केली सुरुवात