खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याच्या कामाला केली सुरुवात

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन—प्रतिनिधी

ओतूर-ओझर-नारायणगाव रस्त्यावरील हिवरे खुर्द व कारखाना फाटा रस्त्याच्या दुरावस्थेची तत्काळ दखल घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली.

नारायणगाव-ओतूर रस्त्यावरील हिवरे खुर्द, कारखाना फाटा या रस्त्याचे काम वन विभागाशी संबंधित असल्याने कि.मी. ६१.२०० ते कि.मी.८१.७०० दरम्यानचे काम रखडले आहे, तर कि.मी.७६.१०० ते कि.मी. ६८.३०० या लांबीत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याने रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. या संदर्भात डॉ.अमोल कोल्हे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी वन विभाग व उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अशी माहिती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल) यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना दिली.

या प्रस्तावांवर निर्णय होईपर्यंत वेळ लागणार असल्याने या ठिकाणी तातडीने खड्डे भरुन रस्ता दुरुस्त करण्याची सूचना डॉ.अमोल कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. नागरिकांना वाहने चालवताना होणारा त्रास व खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ.अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (दि. ६ ऑगस्ट रोजी) सकाळीच खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली.

या संदर्भात आपण लवकरच वनविभागाशी चर्चा करणार असून आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांशीही चर्चा करून प्रलंबित राहिलेले रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

जाहिरात