मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने तात्काळ मागे घ्यावा -नवाब मलिक

अमोल भोसले,पुणे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असताना आता कर्नाटक सरकारने मराठी संस्था बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला असून हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कर्नाटकात मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होत आहे. आता हा अन्याय मर्यादेपलीकडे जात आहे. भाषेवर प्रेम करणारे लोक देशभर असतात. कर्नाटक राज्यात मराठी भाषा आणि महाराष्ट्राला विरोध होत असताना आता यापलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाही करण्यात आली. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री ही छोटी-मोठी घटना असल्याचे म्हणत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन यावर तात्काळ माफी मागावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

कर्नाटकात मराठी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व इतर लोकांच्या वेगवेगळ्या संघटना असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला कशापद्धतीने जगायचे हा मूलभूत अधिकार असताना यावर गदा आणण्याचे काम कर्नाटक सरकार करत असेल तर मराठी भाषिक जनता ते सहन करणार नाही. मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ स्थगित करावा, असेही नवाब मलिक म्हणाले.

Previous articleबंद यशवंत सहकारी साखर कारखान्यातून चोरीचा प्रयत्न
Next articleकेंदुर मध्ये भरदिवसा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार; डोक्यात वार करून तरूणाची हत्या