बंद यशवंत सहकारी साखर कारखान्यातून चोरीचा प्रयत्न

अमोल भोसले , उरुळी कांचन

साखर कारखान्यात जाळी कपांवुंड तोडुन आत प्रवेश करून  सुरक्षा रक्षकांना शस्त्रांचा धाक दाखवुन वर्कशॉप मधील उघडयावर असलेले लोखंडी साहित्य चोरुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना सुरक्षारक्षकांनी जागीच पकडले असून दोघे शस्त्रांचा धाक दाखवुन पळुन गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दोघेही अल्पवयीन आहेत. सदर प्रकार थेऊर ( ता हवेली ) येथील ) यशवंत सहकारी साखर कारखान्यात घडला आहे. चोरट्यांनी चोरलेली ४ लोखंडी भंगार मटेरिअल असलेली पोती पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.

याप्रकरणी इंडियन फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस एजन्सीचे व्यवस्थापक दयानंद हनुमंत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तात्या देवकर व गोपाल उर्फ रोहन जाधव (दोघे रा. जाधववस्ती, थेऊर, ता हवेली) यांचेसमवेत १६ व १७ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत कारखाना गेले ११ वर्षापासून बंद आहे. सध्या तो महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटीव्ह बँक, रिजनल ऑफिस पुणे या बँकेच्या कायदेशिर ताब्यात आहे. सदर बंद स्थितीतील कारखान्यातुन मशिन पार्टस, मोटर्स, भंगार चोरी होण्याचे प्रकार यशवंत बंद पडले पासुन वारंवार होत आहेत.

रविवार (१९ डिसेंबर) रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक रविंद्र काळे हे  कारखान्याच्या आवारात पेट्रोलींग करीत असताना त्यांना  वर्कशॉप मध्ये लोखंड तोडण्याचा आवाज आला, म्हणुन त्यांनी आपल्या केशव चव्हाण, अरिफ शेख, भाऊ रासगे, रामराव कल्याणकर या सहकाऱ्यांना बोलाविले. सर्वांनी मिळुन त्या चोरटयांना आवाज देवुन वर्कशॉपचे बाहेर येण्यास सांगितले असता, त्यांच्या पैकी देवकर व जाधव हे दोघे बाहेर आले. त्यांनी सुरक्षारक्षकांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला व ते कारखान्यालगतच्या मुळा मुठा नदीच्या बाजुचे कंपावुंड वरुन उडया मारुन पळून गेले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी बॅटरीच्या उजेडात वर्कशॉप मधुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे ४ लोखंडी भंगार मटेरिअल भरलेली पोती होती. पोलीस आलेनंतर त्या दोन अल्पवयीन चोरटयांना पोलीसांच्या स्वाधिन केले. पोलीसांनी सर्व हकिकत जाणुन घेवुन ते दोघे अल्पवयीन असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांचे पालकांच्या ताब्यात दिले आहे.

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत वांंढेकर , युवक जिल्हाध्यक्षपदी मयूर सोळसकर, शेतकरी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल कुंजीर यांची निवड
Next articleमराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने तात्काळ मागे घ्यावा -नवाब मलिक