‘सारथी’तर्फे स्पॉन्सरशीप देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ‘सारथी’तर्फे स्पॉन्सरशीप देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ‘सारथी’ संस्थेने विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या माध्यमातून मराठा व कुणबी मराठा प्रवर्गातील राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी रु. १५ हजार रकमेच्या अर्थसहाय्यासाठी (स्पॉन्सरशीप) ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत ही प्रक्रिया होत नसल्याने विद्यार्थ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही ‘सारथी’कडून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या मराठा व कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ‘सारथी’कडून अर्थसहाय्य (स्पॉन्सरशीप) देण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एकरकमी रु. १५ हजार अर्थसहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया ‘सारथी’ने सुरू केली आहे. त्यासाठी २२ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या मराठा व कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी
https://forms.gle/iFYwujXB2Fz9qKZH7 या लिंकवर तत्काळ अर्ज करावे असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

Previous articleदिपक हरणे यांचा सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने गौरव
Next articleबाल दिनाचे औचित्य साधून फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपच्या बाल गिर्यारोहकांनी केला वानर लिंगी सुळका सर