बाल दिनाचे औचित्य साधून फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपच्या बाल गिर्यारोहकांनी केला वानर लिंगी सुळका सर

राजगुरुनगर-  येथील फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपचे बाल गिर्यारोहक अभिनव अजित आरुडे (वय १३ ) व आदित्य अशोक कोरडे (वय १३)यांनी जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाटाजवळच्या जीवधन किल्ल्याचा एक भाग असणाऱ्या वानरलिंगी सुळक्यावर यशस्वी चढाई केली.

जमिनीपासून ३८५ फूट उंचीवर असलेल्या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करण्यासाठी क्लाइंबिंग व जीवधन किल्ल्यावरून व्हॅली क्रॉसिंग करून जाणे हे दोनच मार्ग अवलंबता येतात. फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुप व मावळे माउंटन रेंजर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या जीवधन वानरलिंगी सुळका मोहिमेत राजगुरुनगरचे अक्षय भोगाडे, अजित आरूडे, अशोक कोरडे, सचिन पुरी, संदीप राऊत, भाग्येश जाधव, अमर माने, दीपक साळुंके, शीतल जगताप, सुहास पाटील, ऐश्वर्या लगड, मयुरेश हिंगे, अभी काळभोर, प्रथमेश घुले, स्वराज चव्हाण, तात्या गायकवाड, विशाल चव्हाण व रवी कुंभार हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

रविवारी (ता. १४) पहाटे दाट धुक्यात या सुळक्याकडे सर्वांनी वाटचाल सुरू केली. दोन तासाच्या पायपिटीनंतर सर्वजण जीवधन किल्ल्यावर पोचले. रोप फिक्स केल्यानंतर सर्व सदस्यांनी जीवधन ते वानरलिंगीपर्यंत व्हॅली क्रॉसिंग करत सुळक्यावर आरोहण केले.

बाल दिनानिमित्त वानरलिंगी सुळक्यावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन करून सर्वांनी बाल दिन साजरा केला. त्यानंतर ३८५ फूट रॅपलिंग करत सर्वांनी मोहीम पूर्ण केली.

यावेळी अभिनव आरूडे आणि आदित्य कोरडे या दोन बाल गिर्यारोहकांनी तेथून जवळच असणाऱ्या घाटघर या आदिवासी गावात जाऊन तेथील मुलांना बालदिनानिमित्त खाऊ व मिठाईचे वाटप करून उत्साहाने बाल दिन साजरा केला.

भविष्यात अशा साहसी मोहिमा आयोजित करून बाल गिर्यारोहकांना गिर्यारोहणाची आवड निर्माण करण्याची इच्छा असल्याचे ग्रुपचे ऍडमिन अक्षय भोगाडे व सचिन पुरी यांनी सांगितले.

Previous article‘सारथी’तर्फे स्पॉन्सरशीप देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
Next articleसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेत सिध्दार्थ बुचडे प्रथम