बॅक ऑफ इंडियाच्या उरुळी कांचन शाखेत ग्राहकांची गैरसोय; कार्यालयीन कारभाराचा होतोयं ग्राहकांना त्रास

अमोल भोसले,उरूळी कांचन

बँकेच्या नामावलीत अग्रेसर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या उरुळी कांचन शाखेत कर्मचाऱ्यांच्या अडणूकीमुळे ग्राहकांना विनाकारण त्रास होत असल्याची माहिती पुढे येत आहे.ग्राहक सेवेकडे व्यवस्थापक कानाडोळा करीत असून,प्रत्येक कामासाठी हेलपाटे मारावे लागल्याने वयस्कर,पेन्शनर व महिला ग्राहकांची गैरसोय होत आहे.’चोर ते चोर अन वर शिरजोर’ या उक्तीप्रमाणे  पोलीसांना बोलावून ग्राहकांना दमदाटी केली जात आहे अशी तक्रार बँकेचे ग्राहक रामभाऊ तुपे, आप्पा कड,गणपत कड आदींनी लेखी निवेदन देऊन केली आहे.

    ग्राहकांची कोरोनाचा बागुलबुवा करीत अडवणूक करण्याच्या भूमिकेने बँकेची ही शाखा ग्राहकांच्या तक्रारींची पेढी झाली आहे.शेतकरी,व्यापारी व छोटे व्यावसायिक या ग्राहकांचे हित जपून ग्रामीण भागात तत्पर ग्राहक सेवा देण्याच्या आरबीआयच्या निर्देशानुसार काम न करता मनमानी करत वेळेवर सेवा न देणे,उध्दटपणाची वागणूक देणे,बँकेत येण्यास ग्राहकाला मज्जाव करणे, लॉकरचा वापर करण्यास अटकाव करणे,अशिक्षित व वयोवृद्ध ग्राहकाला डिजीटल व्यवहारांंची सक्ती करणे,केंद्र व राज्य सरकारांशी निगडीत योजनांची माहिती न देणे, कार्यालयीन कामकाजातील त्रुटी दूर न करणे व कोरोना काळात बचत खाते ग्राहकांना सेवा देणेस टाळाटाळ करणे वा मेडीकल सर्टिफिकेट आणण्यास सांगणे,अशा एका ना अनेक कारणाने ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

उरुळी कांचन परिसरात बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ईतर बँकांपेक्षा सर्वाधिक ग्राहक संख्या आहे.तसेच या बँकेत बचत खाती,मुदत ठेव योजना,कर्ज खातेदार संख्या अधिक आहे. मात्र अलिकडच्या काळात या शाखेत व्यवस्थापनावर नियंत्रण राहिले नसल्याने ही बँक ‘मोठं घर पोकळ वासा ‘अशी झाली आहे.ग्राहकांना सेवा मिळण्यासाठी झगडावे लागत असल्याची स्थिती कामकाजातून पुढे आली आहे.व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकारी ग्राहकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याने तक्रारी कमी होण्याऐवजी वाढतच  असल्याने या शाखेच्या अश्या कारभाराला पायबंद कोण घालणार अशी तक्रार बँकेचे ग्राहक व उरुळी कांचनचे माजी उपसरपंच रामभाऊ तुपे व कोरेगावमूळ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आप्पा कड यांनी केली आहे.

नियोजनातील अभावाने बँकेच्या दारात ग्राहकांची गर्दी होऊन सोशल डिस्टंशिंगचा फज्जा उडत आहे.

Previous articleतुळशीराम चौधरी यांची श्रीदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleउन्हाळा सुट्टीतील कामकाजाबद्दल शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी-गौतम कांबळे