न्याय हक्कासाठी वीज कंत्राटी कामगारांचा घेराव

सुरेश बागल,कुरकुंभ

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या व विविध मागण्या यासाठी बुधवार (दि.२०) रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ ) वतीने राज्यभरातून सुमारे तीन हजार कंत्राटी कामगारांनी वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयासमोर घेराव घालून आंदोलन केले. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस मोहन येनुरे व मुंबई अध्यक्ष बापू दडस यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. शासनावर बोजा येणार नाही व या कामगारांच्या बऱ्यापैकी समश्या सुटतील अशा उपाययोजना सुचवल्या असून, मुख्यमंत्री यांनी मध्यस्ती करून, सकारात्मक तोडगा काढावा ही अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे,कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके व कोषाध्यक्ष राहुल पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विद्युत कंपनीमधील कंत्राटी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, मुंबई अध्यक्ष सुनील कांबळे व कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष आण्णाजी देसाई यांच्यासोबत चर्चा केली .यावेळी कार्याध्यक्ष उमेश आणेराव,संघटन मंत्री राहुल बोडके,मुख्यालयातील प्रकाश भांबुरडेकर उपस्थित होते.

संघटनेने एच डी एफ सी बँकेमार्फत तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना अकरा लाखांचा विमा करण्याचा करार झाला असून, याबाबत कंपनीतर्फे संबंधितांना सूचना दिल्या जातील. तसेच दिवाळीपूर्वी वेतन देण्याबाबत सूचना दिल्या जातील आणि नोव्हेंबरमध्ये कंत्राटी कामगारांच्या समश्यांबाबत मिटिंग घेण्यात येईल ,” आश्वासन महावितरणतर्फे सिंघल यांनी दिले.

कंत्राटदार व प्रशासकीय अधिकार्यांना ऊर्जामंत्री
अभय देत आहेत का ? निलेश खरात

महापारेषण, महावितरण व महानिर्मिती या कंपनीमध्ये सुमारे ४० हजार कंत्राटी कामगार सुमारे १० ते २० वर्षांपासून वीज कंपनीतील विविध नियमित रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत आहेत. भरतीमध्ये प्राधान्य नाही, आरक्षण नाही,वयात सवलत नाही,भरतीचे निकष चुकीचे कोविड काळात ५५ कामगार मृत्युमुखी पडले तरी मदत नाही,कंत्राटदार बदलला की पुन्हा कामासाठी ३० ते ४० हजारांची मागणी होते. पगारातून अनधिकृत कपात,भविष्य निर्वाह निधीवर डल्ला,कोऱ्या चेक व पेपरवर सह्या घेणे,रोजगाराची सुरक्षा नाही, वर वसुली झालीच पाहिजे, २४ तास कामाला बांधील राहिले पाहिजे, ना पेट्रोल भत्ता, ना फोन भत्ता, बिन पगारी फुल अधिकारी ‘ अशी अवस्था वीज कंत्राटी कामगारांची आज झालेली आहे .

दोन वर्षे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे अनेक पत्रव्यवहार झाले, निवेदने दिली,आंदोलने केली, प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र मंत्री महोदयाना आपल्याच ऊर्जा खात्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या समश्या सोडवायला वेळ नसल्याने काही कंत्राटदार व प्रशासकीय अधिकारी संगनमताने शासकीय निधीची लूट करत आहेत ,याकडे ऊर्जामंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दोषींवर कारवाई करायचे सोडून कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री अभय देत आहेत का” ? असा सवाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी उपस्थित केला आहे.

Previous articleनानासाहेब गवळी यांची कानगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
Next articleवाळकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी २१ जणांची वर्णी