पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एका ठगास अटक

नारायणगाव : (किरण वाजगे)

आम्ही पोलीस आहोत चेकिंग चालू आहे, तुमचा जवळचा ऐवज खिशामध्ये ठेवा किंवा पिशवीत ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसवणाऱ्या दोन पैकी एका आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याला आळा घालण्यासाठी अशाप्रकारच्या गुन्हा करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

त्यानुसार रविवार दि. १० रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या जुन्नर खेड पथकाचे खेड विभागात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटरसायकल ही लोणी काळभोर येथे राहणारा अलीरजा उर्फ अवनू इराणी हा वापरत असून त्याच्यावर यापूर्वी देखील मालमत्ते संबंधी गुन्हे दाखल आहेत. तो रविवारी (शिरोली, तालुका खेड जिल्हा पुणे) गावच्या हद्दीत शिरोली फाटा या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती होती. त्यानुसार तात्काळ या ठिकाणी सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयित इसमाला शिरोली फाट्यावरून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अलीरजा उर्फ अवनु हुसेन इराणी (वय वर्ष २२ रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर जि. पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता, हा गुन्हा मी आणि माझा एक साथीदार असे आम्ही दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली.
त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, एक मोबाइल तसेच एक सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढील कार्यवाही साठी त्याला ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, शिवाजी ननावरे , पोलिस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, धीरज जाधव, निलेश सुपेकर ,प्रसन्न घाडगे,राजापूरे, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली.

Previous articleशिरूर मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मित्र मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा
Next articleसीएसटीपीएल फाउंडेशनच्या माध्यमातून दौंडला पहिली आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू