मानव आणि वन्यजीव समन्वयासाठी पर्यावरणाचा समतोल आवश्यक -प्रदिप रौंधळ वनपरिक्षेत्र अधिकारी

राजगुरुनगर- (वृत्त विशेष)
मानव- वन्यजीव संघर्ष आणि उपाययोजना यावर वनविभाग खेड, रेस्क्यू टीम व स्वयंसेवी संस्थांचा परिसंवाद संपन्न…

आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक वन्यजीव सप्ताहाचा शिरोली येथील वनविभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ( 7 ते 10 ऑक्टोबर)  शुभारंभ करताना खेड वनविभागाने खेड तालुक्यातील पर्यावरण क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून मानव आणि वन्यजीव संघर्ष या विषयावर एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते.यावेळी वन्यजीव संघर्ष व मानवी जीवनातील समन्वय यासह पर्यावरण विषयक विविध समस्या व संभाव्य उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील प्रत्येक गावातील जैवविविधता व वनसंपदेचे महत्त्व अनन्यसाधारण असून याबाबत गावातील समाजमन जागरूक व संवेदनशील होणे आवश्यक आहे.असे झाल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाईल व मानव आणि वन्यजीवातील अनावश्यक संघर्ष निश्चितपणे कमी होईल.असा विश्वास खेड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ यांनी व्यक्त केला.मागील काळात खेड तालुक्यातील एकाकी महिलेवर बिबट्या ने हल्ला करून तिला ठार मारले होते.त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या चर्चा सत्रात बिबट प्राण्याचे जैवशृंखलेमधील महत्त्व व त्याच्या मानवी जीवनातील हस्तक्षेपांची कारणमीमांसा करण्यात आली.बिबट्या बाबत पसरलेले गैरसमज व भिती देखील अतिशयोक्ती पूर्ण असून ती दूर करण्यासाठी सुद्धा जनजागृती आवश्यक आहे. याकरिता पथनाट्य उपक्रमासह पिंजरामुक्त शिवार ही अभिनव संकल्पना वन्यजीव आणि मानव यांच्यातील समन्वय व सहजीवनावर आधारित असून याकामी ग्रामस्थ व नागरिकांना विश्वासात घेऊन वनविभागाच्या वतीने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विशेष कृति कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी नव्याने पदभार स्वीकारलेल्या खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ यांना स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

चर्चासत्रात ज्येष्ठ सर्पमित्र देवराम शिंदे,लाईफ जागतिक पर्यावरण संस्थेचे समन्वयक संजय नाईकरे,सर्पमित्र सागर कोहिनकर,निखिल वाघमारे,प्रदिप कासारे,प्रिया थोरात, काजल गायकवाड,जीवन इंगळे, नागेश थिगळे,स्वप्निल खंडागळे,अतुल गारगोटे हे रेस्क्यू टीमचे सदस्य व सर्पमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पाटोळे यांनी वनविभागाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.

Previous articleवाघोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Next articleॲड.देवेंद्र बुट्टे पाटील यांची सहाव्यांदा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड