बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वर नारायणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

गाय व बैलाचे मांस बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पो चालकाला नारायणगाव पोलिसांनी आज ताब्यात घेऊन ४ हजार ५०० किलो वजनाचे अंदाचे ६ लाख ७५ हजार रूपये किमतीचे गोमांस व आयशर टेम्पो जप्त केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहाय्यक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

रियाजुद्दीन मेहकु खान (वय २८ वर्षे, सध्या रा माजीवाडा ब्रिजच्या खाली झोपडपट्टी ता जि ठाणे ,मूळ रा. शंकरपूर जिल्हा बहिराज उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २४ रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास नारायणगाव पोलिस ठाण्याचे स.पो.निरिक्षक ताटे यांना माहिती मिळाली की, संगमनेर येथून मिनी आयशर टेम्पो क्रमांक एम एच ०४ जे.यु १५६ या टेम्पोमध्ये गाई व बैलांचे मांस भरून ही गाडी पुणे नाशिक हायवेने मुंबईकडे जाणार आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री करून स पो नि ताटे व पोलीस पथक रवाना होवून सदर गाडी ही मौजे नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे गावच्या हद्दीत पुणे नाशिक बायपास रोडवर पाटेखैरेमळा चौक येथे मिळून आली. ती गाडी ताब्यात घेवून सदर गाडीवरील इसमाकडे चौकशी करून गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये गाय-बैलांचे कापलेले मांस पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना वाहतूक करताना आढळून आला. त्यानुसार नारायणगाव पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पो.अधीक्षक मितेश घट्टे , उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस ठाण्याचे पो. निरीक्षक विलास देशपांडे ,स.पो.निरिक्षक पृथ्वीराज ताटे, पो.उप निरीक्षक धनवे तसेच पो.ना दुपारगुडे ,पो.शिपाई सातपुते, अरगडे व इतर पथकाने केली.

Previous articleमोटरसायकलच्या डिकीतून दोन लाख ४० हजार लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
Next articleअष्टापूर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विजय कोतवाल तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोतवाल यांची निवड