अखेर नारायणगावातील डॉ. अजय मते वर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

वैद्यकीय शस्त्रक्रियेनंतर मानवी पाय कचरऱ्या मध्ये टाकून देणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या एका सहाय्यक महिलेवर नारायणगाव पोलीस स्थानकात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बसस्थानका जवळील मते हॉस्पिटल मध्ये एका ८१ वर्षीय जेष्ठ व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून त्याचा काढून टाकलेला मानवी पाय बुधवारी दि. २२ रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळून आला होता. त्यानंतर नारायणगाव परीसरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर आज दिनांक २३ रोजी सकाळी नारायणगाव पोलिसांनी मते हॉस्पिटलचे डॉ.अजय मते व तिथे काम करणार्‍या मावशी सुनिता जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर हलगर्जीपणाने साथरोग पसरवल्याचा ठपका ठेवला आहे.

पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. काही दिवसांपूर्वी मते हॉस्पिटलमध्ये ८१ वर्षीय जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते. पायाला गँगरीन झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचा पाय काढून टाकण्यात आला होता. हा पाय कचरा जमा करणाऱ्या

ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीत टाकण्यात आला. वास्तविक जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून देणे बेकायदेशीर आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार पोपट दुलाजी मोहरे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
दरम्यान डॉक्टर मते व सुनिता जाधव यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २६९, २७० यानुसार कामात हलगर्जी पणा आणि साथरोग पसरवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

Previous articleशिवशंभू छावा प्रतिष्ठाणचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
Next articleलहानपणापासूनच मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गोडी निर्माण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य- निखिल कांचन