दौंडमधील स्वातंत्र्यसैनिकांची ओळख ! स्वातंत्र्यसैनिक सदाशिव चांदोजी फडके

अमोल भोसले,उरुळी कांचन

भारतात १८८५ साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच वर्षी सदाशिव फडके यांचा जन्म कानगाव येथे झाला. १९१० च्या सुमारास ते रेल्वेमध्ये नोकरीला लागले. दहा वर्ष रेल्वेत नोकरी केली मात्र देशाप्रती असलेली प्रेम भावना त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. इंग्रजांच्या विरोधातील त्यांच्या कारवाया चालू होत्या. मात्र ते इंग्रजांना सापडत नव्हते.

१९४२ आंदोलनात त्यांनी इंग्रजांना कडवी झुंज दिली. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात ८ ऑक्टोंबर १९४२ रोजी इंग्रजांनी त्यांना अटक केली. २ जुलै १९४३ रोजी त्यांची येरवडा तुरूंगातून सुटका झाली. त्यांना
स्थानबद्ध करण्यात आले होते. स्वातंत्र्य लढ्यात असताना स्वातंत्र्य सैनिक व मुंबईचे अनभिशिक्त सम्राट, मुंबईचे मेयर, केंद्रिय मंत्री स.का.पाटील, खासदार र.के.खाडीलकर, खासदार तुळशीदास जाधव, जगन्नाथ पाटसकर यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात स.का.पाटील रेल्वे मंत्री झाले. तेव्हा ते कानगाव येथे सदाशिव फडके यांना भेटायला आले होते. स.का.पाटील व त्यांचे दोन सहकारी जीपमधून आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना बंदोबस्त सुद्धा नव्हता. १९७२ मध्ये स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा ताम्रपट देऊन सन्मान केला होता. फडके यांचा मृत्यू १९७६ साली झाला. त्यावेळी ते ९१ वर्षांचे होते. ते हयात असेपर्यंत कानगाव मध्ये १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला फडके यांच्याच हस्ते धज्वारोहन होत असे.

फडके हे धार्मिक वृत्तीचे व तापट स्वभावाचे होते. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती. त्यांना मुलगा नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी एखादा फायदा घेण्यासाठी कोणापुढेही हात पसरले नाही. पेन्शन सोडली तर स्वातंत्र्यसैनिक असल्याचा त्यांनी कुठलाही फायदा घेतला नाही. १९६७ साली दौंडचे आमदार जगन्नाथ पाटसकर यांचा त्यांनी सायकलवर फिरून प्रचार केला. त्यावेळी पाटसकर यांचे चिन्ह होते बैलजोडी.

दौंड येथील प्रेमसुख कटारिया यांनी १९७२ साली आमच्या कुटुंबियांचा सत्कार केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त चौफुला येथील बोरमलनाथ मित्र मंडळाने फडके यांचे नातू उद्धव कान्हू गवळी उर्फ काका गवळी ( मुलीचा मुलगा ) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे. काका गवळी यांनी ही माहिती दिली आहे. धन्यवाद काका गवळी.
शब्दांकन :
रमेश वत्रे सकाळ पत्रकार.

Previous articleखेड घाटात दीडशे फूट खोल दरीत कार कोसळली
Next articleचाकणमध्ये नगरसेवकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल, पत्रकारासह एकाला अटक