मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारे व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद

नारायणगाव (किरण वाजगे)

मंचर (ता. आंबेगाव) येथील शेवाळवाडीचे ग्रामदैवत कळंबादेवी मंदिरा मध्ये २४ जुलै २०२१ रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्री मंदिरात प्रवेश करून दानपेटी मधील रोख रक्कम चोरून नेली होती.

या गुन्ह्याचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्यानुसार मंदिर चोरीतील संशयित इसम लालू बजरंग दुधवडे हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह जाधववाडी परिसरात फिरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाधववाडी येथे तीन जण संशयित फिरत असल्याचे पाहिले. त्याचवेळी पोलिसांची चाहूल लागताच त्या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिताफीने पाठलाग करून पकडले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे १)लालू बजरंग दुधवडे (वय २८ वर्ष रा.वनकुटे ता.संगमनेर जि. अ नगर) २)भरत बजरंग दुधवडे (वय ३० रा. वनकुटे ता.संगमनेर जि. अ नगर) ३)अनिल देउभाऊ काळे वय २१ वर्ष रा. भोजदरी ता. संगमनेर जि. अ नगर) अशी सांगितली.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मंचर शेवाळवाडी येथील मंदिरात चोरी केल्याचे कबुल केले. तसेच आम्ही तिघांनी मिळून एक मोटरसायकल तसेच शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी, केबल व इतर साहित्य चोरल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून एक मोटर सायकल दोन पाण्याच्या मोटार, केबल व इतर साहित्य असे एकूण ७७ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून मंचर व आळेफाटा पोलीस स्टेशन येथील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करिता मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक फौजदार मुकुंद कदम, पोलीस हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, राजू मोमीन, पोलीस नाईक संदीप वारे, कॉन्स्टेबल अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, प्रसाद पिंगळे यांनी केली.

Previous articleवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शुभम वलटे यांनी अंगणवाडीतील बालकांना केली मदत
Next articleफ्लेक्स होर्डिंगला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेकायदेशीर रित्या वृक्षतोड