नागफणी पॉईंट वरून हुतात्मा राजगुरूंना वंदन

राजगुरूनगर- २४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी पॉईंट येथे तिरंगा फडकावित हुतात्मा राजगुरूंना वंदन करीत “भारत माताकी कि जय”, “वंदे मातरम”, “हुतात्मा राजगुरू अमर रहे” या घोषणा देत देशभक्तीच्या मोठ्या उत्साहात गिर्यारोहकांनी राजगुरू जयंती साजरी केली. या ठिकाणी हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन करीत असलेल्या समाजकार्यास सलाम करीत, केलेली ही मोहीम, १३ दिवसात १३०० किलोमीटर अंतर पायी धावत “आग्रा ते राजगड” ही “गरुडझेप मोहीम” करणाऱ्या शिलेदारांना समर्पित केली.

नुकताच भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी हसत हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या वीर राजगुरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे होते. अश्या या थोर क्रांतीकारकांची जयंती मोठ्या उत्साहात गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली.

भोरगिरी भीमाशंकर नागफणी पॉईंट ते पुन्हा भोरगिरी या तब्बल २१ किलोमीटर मोहीमेची सुरवात कोटेश्वर मंदिर, भोरगिरी, ता.खेड, जि.पुणे येथून झाली.

भोरगिरी हुन भीमाशंकर ला जाणारी पाऊलवाट ही दाट जंगलातील आहे. पावसाळ्यात झाडा झुडूपांना पालवी फुटल्याने संपूर्ण परिसर हिरवागार दिसत होता. वाटेत अनेक लहानमोठे धबधबे होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी होते. त्यात दाट धुक्यात हरवलेला परिसर असल्याने नयनरम्य वातावरण होते.विविध पक्ष्यांचे सुमधुर आवाज ऐकत प्रवास सुरु असतानाच महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरु चे ही दर्शन झाले.

पुढे अतिशय दाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग गुप्त भीमाशंकर ला घेऊन जातो. या ठिकाणी कातळकड्यावरून खाली झेपावलाणाऱ्या भिमा नदीच्या पांढऱ्याशुभ्र जलधारांचा प्रचंड आवाज मनाला तृप्त करणारा होता. येथून अजून पुढे गेल्यावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरा समोर सर्व नतमस्तक झाले.

येथून पुढे गेल्यावर मात्र हनुमान तळाच्या पुढील मार्ग अतिशय खडतर होता. खड्या चढाईची दमछाक करणारी वाट, त्यात खडकाळ टप्प्यावर शेवाळ असल्याने प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागत होते. त्यात एका बाजूला खोल दरी आणि खड्या चढाईची निसरडी आणि चिखलमय पाऊल वाट शेवटच्या नागफणी पॉईंट ला घेऊन जाते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा मार्ग, संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी व चिखलमय पाऊलवाट, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.

अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात डॉ.समीर भिसे, ओंकार रौंधळ, सागर टावरे, शुभम चव्हाण, मनोज रौंधळ, मयुर गिधे, आकाश मुसुंडे, गणेश जाधव, ओंकार बारवेकर, मारुती राजगोळकर या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित हुतात्मा राजगुरूंना वंदन करीत देश भक्तीच्या भावनेने मोठ्या उत्साहात अनोख्या पद्धतीने हुतात्मा राजगुरू जयंती साजरी केली.

हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन

हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. निराधार, बेवारस, अपंग, दीन दुबळ्या, वंचित, मनोरुग्ण लोकांसाठी काम केले आहे. सफाई कामगार, गरजू परित्यक्ता, विधवा महिलंसाठी किराणा स्वरुपी मदत केली आहे. अनाथालय, वृद्धाश्रम, मनोरुग्ण सांभाळणाऱ्या संस्था यांना मदत केली आहे. खेड तालुक्यातील ठाकर वाड्यांवर फराळ, मिठाई कपडे वाटून दिवाळी साजरी केली आहे. उन्हाळयात दुष्काळग्रस्त भागात टँकर ने पाणी पुरवठा केला आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत केली आहे. कोरोना काळात भोजनालय, रक्तदान शिबिर, पोलीस बांधवांना नाश्ता चहा, गरजू कुटुंबांना किराणा स्वरूपात भरघोस मदत केली आहे. त्याच प्रमाणे, जलपर्णी हटाव मोहीम, पर्यावरण पूरक गणेशोत्सव सारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

गरुडझेप मोहीम

औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. आग्र्याची कैद हे शिवरायांवर आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले मोठं संकट होते. आशेचा एकही किरण नसताना औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन कडेकोट बंदोबस्तातून महाराज आणि शंभुराजे सहीसलामतपणे १७ ऑगस्ट,१६५५ रोजी निसटले होते आणि १३ दिवसात राजगडावर सुखरूपपणे परतले होते. ही मोहीम म्हणजे शिवाजी महाराजांची गरुडझेप होती.

शिवाजी महाराजांच्या धैर्याला स्मरण करण्यासाठी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरदार पिलाजी गोळे यांचे १४वे वंशज मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी मावळे आग्रा ते राजगड हे १३०० किलोमीटर चे अंतर पायी धावत १३ दिवसात पूर्ण करीत आहेत. सध्याच्या करोना महामारीतील निराशाजनक वातावरणात राज्याने, देशाने प्रगतीची एक गरुडझेप घ्यावी हाच उद्देश या गरुडझेप मोहिमेचा आहे.

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
Next articleयुवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी -मंत्री नवाब मलिक