पर्यटन स्थळांवर गर्दीऐवजी मन:शांतीला पसंती

पुणे- कोरोनामुळे लादले गेलेले निर्बंध अदयापही कमी झालेले नसल्याने अनेक पर्यटक पर्यटन स्थळांवर जाऊन गर्दी करण्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांवर जाऊन निवांत राहुन मन:शांती अनुभवण्यास पसंती देत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असल्याने पुन्हा पुन्हा नाईलाजास्तव विविध प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी वीकेंड लॉकडाऊन आहे तर दररोज सायंकाळी पाचनंतर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यातूनही काही उत्साही पर्यटक पोलिसांना चुकवुन आणि प्रशासनाला न जुमानता कोरोनाचा धोका पत्करुन निसर्गाचा व पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पर्यटनाला जायचे आणि‍ प्रशासनाला दंड भरायचा ही कटकटच नको म्हणून अनेक सुज्ञ पर्यटक निवांतपणे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास प्राधान्य देत आहेत. पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे , मंदिरे बंद असली तरी रिसॉर्ट चालू असल्याने मन:शांतीसाठी जाऊन रिसॉर्टवर राहण्यास आणि मन:शांती मिळवण्यास पर्यटकांची पसंती मिळत आहे.

काही ठिकाणची पर्यटनस्थळे बंद असल्याचे पर्यटकांना बुकिंगच्या वेळेस सांगण्यात येत असते. अनेक पर्यटक लॉकडाऊनमुळे कंटाळल्याने केवळ निवांतपणासाठी आणि मन:शांती मिळविण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात राहायला येतात. त्यांना पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने रूम सर्व्ह‍िस दिली जाते आहे. यासाठी महामंडळाचा स्टाफ आहे. सर्व स्टॉफचे लसीकरण करण्यात आले असुन त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण दिले आहे. ज्यांना टुरिस्ट स्पॉटवर गर्दीत जायचे नाही, केवळ निवांतपणा हवा आहे आणि सोबत कामही करावयाचे आहे अशा पर्यटकांना वर्क फ्रॉम नेचर करता यावे यासाठी महाबळेश्वर सारख्या पर्यटक निवासांमध्ये वाय-फाय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. भटकंतीऐवजी निसर्गाच्या सहवासात रिसॉर्टवर निवांत पडून राहण्यास निश्चित पसंती मिळत आहे.– श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे

आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या असुन शासनाच्या कोरोना बाबतच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासे सुरू झाली असून www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. या बाबतची माहिती महामंडळाच्या वेबसाईटवर दर्शविण्यात आली आहे.

Previous articleनारायणगाव येथे रेडिमेड कपड्याच्या गोदामाला आग:पंचवीस लाख रुपयांचा ऐवज आगीत खाक
Next articleराष्ट्रवादी कडून बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते फित कापून नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत उद्घाटन