मंचर येथे ५० वर्षीय व्यक्तीचा गळा आवळून खून ; आरोपी फरार

प्रमोद दांगट

मंचर मुळेवाडी (ता. आंबेगाव) येथे कैलास सोमनाथ ठाकूर या ५० वर्षीय व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.हा खून दिपक साळुंके उर्फ फारूक यांनी केला असल्याची फिर्यात दत्तात्रय सोमनाथ ठाकूर ( रा.मंचर ता.आंबेगाव पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.हा खून नेमकी कुठल्या कारणामुळे झाला याचा शोध मंचर पोलिस घेत आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी (दि. ८) मंचर-ढोबीमळा येथे दत्तात्रय सोमनाथ ठाकुर (वय ४०) आणि त्यांचा भाऊ कैलास सोमनाथ ठाकुर हे घरी असताना त्यांच्या ओळखीचा दीपक साळुंके ऊर्फ पारुख घरी आले आणि कैलास याला माझ्या बरोबर शेतात ऊस काढण्यासाठी घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर दोन दिवस कैलास ठाकुर घरी आला नाही. त्यानंतर दि.१० रोजी दिपक साळुंके हा फिर्यादीला भेटला असता त्याने कैलास ठाकुर हा कोठे आहे असे विचारले असता फारुक याने तो उसलागवड करण्यासाठी गेला असून तिकडेच राहत असल्याचे सांगितले. त्यानंतरही कैलास दोन दिवस घरी न आल्याने फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांनी कैलास ठाकुर यांचा नातेवाइकांकडे आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, परंतु ते मिळून आला नाही. त्यानंतर सोमवारी (दि. १२) रात्री दत्तात्रय ठाकुर त्यांचा भाऊ कैलास ठाकुर यांचा मुळेवाडी परिसरात शोध घेत असताना मंचर मुळेवाडी रस्त्यालगत वाघवाडी येथे विजय काशिनाथ थोरात यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील खोलीमध्ये एक जण मृतावस्थेत मिळाल्याचे कळले. फिर्यादी यांनी तेथे जाऊन पाहिले असता कैलास ठाकुर यांच्या गळ्याभोवती दोरी बांधलेली, चेहरा काळा-निळा पडलेला होता. नाका-तोंडातून रक्त आले होते. शरीराची दुर्गंधी पसरलेली होती. याबाबत दत्तात्रय ठाकुर यांनी आपल्या भावाचा मृतदेह ओळखून त्याचा गळा आवळून खून दिपक साळुंके उर्फ फारूक यानेच केला असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.फरार आरोपी फारूक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी भेट देऊन माहिती घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर अर्जुन शिंदे पुढील तपास करत आहे.

Previous articleलक्ष्मण दवणे यांची ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleमराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सोशल मिडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश खरमरे यांची नियुक्ती