सराईत चोरट्यांकडून वीस मोटारसायकल जप्त

नारायणगाव (किरण वाजगे)

उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील काही भागात मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून शिताफीने पकडले अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट गुड नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पुणे ग्रामीण भागातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतुर तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून मोटरसायकल चोरणारा आरोपी किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्यासोबत चोरीच्या मोटरसायकली घेण्यासाठी रांजणी (ता. आंबेगाव जिल्हा पुणे) येथिल कारफाटा येथे आदित्य निकम याच्याकडे येणार असल्याचे पोलिसांना खबऱ्यांमार्फत कळाले होते.
त्यानुसार कारफाटा येथे सापळा लावून गुन्हे अन्वेषण विभागाची टीम तेथे थांबली असता एक जण विना नंबरच्या मोटरसायकलीवर संशयितरित्या फिरताना त्यांना आढळला. काही वेळानंतर तेथे दोन इसम मोटरसायकलीवर आले. त्यांना पोलिसांनी थांबवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे किरण भास्कर पिंपळे (वय २५, रा दरडगाव ता राहुरी जि. नगर), प्रवीण नामदेव बाचकर (वय २८ रा. कानगर ता. राहुरी जि. नगर) व आदित्य दत्तू निकम (वय १९ रा. खोडद, ता. जुन्नर) असे असल्याचे सांगितले.

यातील इसम आदित्य निकम यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकलींबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा साथीदार रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह पुणे व नगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोटारसायकली चोरी केल्या आहेत. चोरलेल्या मोटरसायकली आम्ही किरण पिंपळे, प्रवीण बाचकर, कैलास येळे यांच्याकडे विकायला देत होतो.चोरलेल्या मोटरसायकली पैकी काही मोटरसायकली आदित्य निकम यांच्या घराजवळ लावल्या असून काही मोटारसायकली किरण पिंपळे प्रवीण बाचकर, कैलास येळे यांच्याकडे आहेत. अशी माहिती दिली.

या माहितीवरून वरील ठिकाणी जावून ८ लाख ७० हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण २० मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या मोटरसायकली खेड, पारनेर, शिरूर, ओतूर, यवत, आळेफाटा येथील पोलिस स्टेशनच्या परिसरात चोरलेल्या आहेत.

दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर धनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नेताजी गंधारे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दिपक साबळे, पोलीस नाईक दिपक साबळे, संदीप वारे, शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम, प्रसाद पिंगळे, दगडू वीरकर, तसेच नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक दिनेश साबळे व सचिन कोबल यांच्या पथकाने ही कारवाई करण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous articleपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ यांचा सन्मान
Next articleवैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती ताटे यांचा सन्मान