पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ यांचा सन्मान

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव, वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी ग्रामीण विभागांमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात रुग्ण कल्याण समिती मध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्वाधिक जास्त कोरोना वरील लसीकरण केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्या हस्ते त्यांचा आज विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अर्चना माळवदकर, सदस्य दिलीप गांजाळे, गट विकास अधिकारी, सरपंच राजेंद्र मेहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नुकताच झाला.

गेली दिड वर्ष कोरोना महामारीच्या कालावधी मध्ये सातत्याने वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गुंजाळ कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना कोरोना विषाणूच्या संदर्भात नारायणगाव, वारूळवाडी गुंजाळवाडी, येडगाव, मांजरवाडी आदी परिसरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ गुंजाळ यांचा अनेक संस्थांच्या वतीने तसेच सामाजिक व सहकारी संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आमदार अतुल बेनके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, माजी ग्रामपंचायत उपसरपंच संतोष वाजगे, सामाजिक कार्यकर्त्या रूचिरा वाजगे, सुजित खैरे आदींनी डॉ. वर्षा गुंजाळ यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleपुरंदरच्या अंजिराला जगभरात किंमत : अंजिराला भौगोलिक मानांकन
Next articleसराईत चोरट्यांकडून वीस मोटारसायकल जप्त