वडगाव कांदळी येथील कुकडी नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह

नारायणगाव (किरण वाजगे)

वडगाव कांदळी (तालुका जुन्नर) येथील माळीमळा शिवाराजवळील कुकडी नदीपात्रामध्ये अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या एका महिलेचा मृतदेह आढळला.
ही घटना मंगळवार (दि.६) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची खबर वडगाव कांदळीचे पोलीस पाटील बाळासाहेब पुंडलिक पाचपुते (वय ५४) यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव कांदळी येथील माळीमळा शिवाराजवळील कुकडी नदी पात्रात अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचे प्रेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आढळले असून मृत महिलेच्या अंगामध्ये निळ्या रंगाचा परकर व हिरव्या रंगाचा ब्लाउज असून नदीपात्रातून या महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मयताची ओळख पटली नाही. नारायणगाव पोलीस स्थानकात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान वरील वर्णनाची मृत महिला कोणाच्याही ओळखीची असल्यास नारायणगाव पोलिस स्थानकाशी (०२१३२ २४२०३३) संपर्क साधण्याचे आवाहन स.पो. निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.पुढील तपास पोलीस नाईक भीमराव लोंढे हे करीत आहे.

Previous articleगोमांस वाहतूक व विक्री च्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने नारायणगाव पोलिसांना निवेदन
Next articleमहाडिक फार्म महाडिक अँग्रो टुरिझमचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न