चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून पैसे लुबाडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

नारायणगाव ( किरण वाजगे)

नारायणगाव (ता.जुन्नर) येथील बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहण्याचा बहाणा करून बसची वाट पहात बसणाऱ्या प्रवाशांना एकटे असल्याचे पाहून तसेच प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी काही तासातच शिताफीने अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.२ जुलै) रोजी प्रवासी निलेश जाधव (रा.हिंगोली) हे पहाटे १ च्या सुमारास आपल्या दोन साथीदारांसह नारायणगाव बस स्थानक येथे एसटीची वाट पहात बसले होते. त्यांच्या जवळ एक अज्ञात इसम येऊन,त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १६०० रुपये हिसकावून घेतले. अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. फिर्याद येताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिसांनी एसटी बस स्थानक शिवारात आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला.
फिर्यादीने पोलिसांना सांगितलेल्या वर्णनावरून चाणाक्ष पोलिसांच्या नजरेने सावज हेरले.

बसस्थानकाजवळील एका दुकानासमोर फिर्यादीने वर्णन केलेला आरोपी बसला होता. पोलिसांनी अलगद त्याला जाळ्यात पकडले. त्याला नाव विचारले असता, नितीन संजय जाधव (रा.आळकुटी, ता. पारनेर,जि. नगर) असे सांगितले. त्यास पोलिसांनी लागलीच अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळचे १६००/- रुपये रोख रक्कम पोलिस तपासात मिळून आली. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

या गुन्ह्याच्या तपास कामी पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर सहायक पोलिस अधिक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.कॉ.सचिन कोबल,पो.कॉ. लोहोटे, पोलिस मित्र आकाश खंडे, पोलिस मित्र ढोबळे यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक के.डी. ढमाले करीत आहेत.

Previous articleवाघोली- पेट्रोल,डिझेल व खाद्य तेलाच्या दरवाढीच्या निषेधार्थ आमदार अॕड.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन
Next articleकारची मोटर सायकलला धडक पित्याचा जागीच मृत्यू ठार ; पाच वर्षाची मुलगी जखमी