पोलीस असल्याचे सांगून दागिने लुटले

प्रमोद दांगट, निरगुडसर

पारगाव- लोणी रस्त्यावरील जारकरवाडी – बढेकरमळा (ता. आंबेगाव) येथे मुलीकडे जात असलेल्या नारायण शंकर गावडे ( वय ५५ रा.धापटे ता.शिरूर पुणे ) यांना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगून  सोन्याची चैन आणि हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज भरदिवसा लुटला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,जारकरवाडी हद्दीतील बढेकरमळा येथील इंग्लिश मेडिअम स्कूल जवळून नारायण गावडे हे त्यांच्या मुलीकडे जात होते. त्यावेळी मोटार सायकलवरील दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून नारायण गावडे यांची गाडी थांबवली व तुम्ही इकडे अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू शकत नाही.पुढे साहेबांची गाडी उभी असून तुमची तपासणी होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या गळ्यातील सोनसाखळी व दोन सोन्याच्या अंगठ्या या रुमालात काढून ठेवा असे सांगितले. गावडे यांनी सोन्याची चैन व अंगठया काढून रूमालात ठेवल्या त्यावेळी त्या दोघांनी पुढे नाकाबंदी चालू आहे. असे म्हणत तो रुमाल गावडे यांच्या डीकीट ठेवला व दोघेजण मोटर सायकलवर बसून पारगाव रोडने निघून गेले.त्यानंतर गावडे जारकरवाडी बढेकरमळा येथे आपल्या मुलीच्या घरी आले असता डिकित ठेवलेले दागिने पाहिले असता ते दागिने मिळाले नाही. गावडे यांनी दागिन्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाही. याबाबत सदर दोन इसमांनी हातचलाखी करून आपली फसवणूक केल्याची लक्षात येताच त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleसाखरपुडा करून लग्नास नकार दिल्याने मुलासह चार जणांवर गुन्हा दाखल
Next articleपत्रकारांचे शरद पवारांना साकडे