आळंदीत पहिले शाहिरी व लोककला संमेलन संपन्न

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी – शाहिरी असो वा कीर्तन ही भगवत प्राप्तीची साधने आहेत असे विचार हभप यशोधन महाराज साखरे यांनी पहिल्या शाहिरी व लोककला संमेलन उदघाटन प्रसंगी मांडले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांचे वतीने सो.क्ष.कासार धर्मशाळा आळंदी येथे दोन दिवसांचे पहिले ‘शाहिरी व लोककला संमेलन’ संपन्न झाले.

 

लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच हे संमेलन घेण्यात आले.

यावेळी श्री संत कबीर मठाचे प्रमुख हभप चैतन्य महाराज कबीर,भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक हभप संजय घुंडरे पाटील,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,सो.क्ष.कासार धर्मशाळा आळंदी चे अध्यक्ष मोहन कोळपकर व प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे,प्रा.संगिता मावळे,अजित वडगावकर उपस्थित होते.

शाहिरी व लोककलांना उर्जितावस्था प्राप्त करून देऊन या कलांना जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी कार्यरत असून लोककलावंतांना व लोककलेला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या विषयावर चिंतन, मनन व्हावे म्हणून शाहिरी व लोककला संमेलन घेण्यात आले असल्याची माहिती उदघाटन प्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन लोकोत्तर महापुरुषांचे कार्यकर्तृत्व शाहिरीच्या माध्यमातून समाजापुढे आणून समाजप्रबोधनाची वेगळी वाट चोखाळत असल्याचेही शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सांगितले. संमेलनाच्या उदघाटन सत्रानंतर चंद्रशेखर कोष्टी यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे एकपात्री सादरीकरण केले.त्यानंतर उपस्थित कलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.

उदघाटन प्रसंगी बालशाहीर सक्षम जाधव याने शाहिरी गण व बालशाहीरा निर्झरा उगले हिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा सादर केला.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात हभप अभय महाराज नलगे यांनी वारकरी कीर्तन केले.संध्याकाळच्या सत्रात पुण्यातील प्रख्यात तबलावादक संजय करंदीकर यांनी ‘महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतील तालवाद्ये’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले.यावेळी होनराज मावळे,स्वानंद करंदीकर,मुकुंद कोंडे यांनी तालवाद्यांचे सादरीकरण केले. समारोप प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी, समीर गोरे, शिवम उभे, प्रसाद जाधव, ओंकार चिकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleसंग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारेकऱ्यांना अवघ्या तीन दिवसात अटक
Next articleतरुणांनी आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा – जयंत पाटील