उरुळी कांचन – दुकाने सुरु करायची का नाहीत नागरिकांच्या मध्ये संभ्रम

अमोल भोसले,उरुळी कांचन,

पूर्व हवेलीतील उरुळी कांचन परिसरातील गावांमधील व्यापारी व व्यावसायिकांनी मंगळवारी (ता. १) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व दुकाने उघडली होती. मात्र, शहराप्रमाणेच दुकाने चालू ठेवायची का, बंद करायची.. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रहाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी मध्यस्थी करून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यावश्यक सेवेतील दवाखाना आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद करायला लावली.

पुणे ग्रामीण मधील लोणी कंद आणि लोणी काळभोर या पोलीस ठाण्यांचा पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा त्यांना पुणे महानगरपालिकेला दंड भरल्याची पावती दिली जाते. यामुळे पूर्व हवेलीतील उरुळी कांचन व परिसरातील गावे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात येतात की नाही. तसेच येथील दुकाने सुरु करायची का नाहीत. असा संभ्रह निर्माण झाला आहे असे मत सरपंच संतोष कांचन यांनी मांडले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील ५६ दिवसांपासून प्रशासनाच्या निर्णयाचा व्यापारी आणि व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन पाठींबा दिला आहे. परंतु, सद्या दुकाने बंद असल्यामुळे दैनंदिन काम करणारे मजूर, दुकानातील कामगार आणि दुकानदार यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. तरी, प्रशासनाने आमची दाखल घेऊन शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी असे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी सांगितले.

पुणे शहरात सकाळी ७ ते २ या दरम्यान सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी “अनलॉक” च्या माध्यमातून सोमवारी (ता.३१) संध्याकाळी दिली आहे. मात्र, जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत ”ब्रेक द चैन” ( Break The Chain)”या मोहिमेनुसार ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक ०१/०६/२०२१ रोजी सकाळी ७ वाजलेपासुन ते दिनांक १५/०६/२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत नियम शिथिल करण्यात आला आहे. म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर इतर सर्व दुकाने पहिल्याप्रमाणेच बंदच राहणार आहेत. अशी माहिती डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच

महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असणारे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहतील. यात किराणा, दूध, फळे, भाजीपाला, मिठाई, बेकरी, चिकन-मटण, मासे, कृषी उत्पादने व पूरक व्यवसाय यांची दुकाने सुरू ठेवता येतील. तसेच विकेंड लॉक डाऊनला फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहतील. मात्र, जिल्ह्याबाहेर कोणासही जाता येणार नाही. तसेच जिल्ह्याबाहेरून कोणासही येता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Previous articleभाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी वासुदेव काळे यांची निवड
Next articleमाझ्या उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा तयार केल्याचा संजय घोणे यांचा आरोप