प्रशासनाने कोरोना बरोबरच इतर कामांकडेही लक्ष दयावे ; कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील

प्रमोद दांगट, प्रतिनिधी  : महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विश्रामगृह मंचर येथे आढावा बैठक आयोजित केली होती. आंबेगाव तालुक्यातील महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाविषयी जनतेकडून तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने महसूल खात्यातील दोन जणांवर कारवाई झाली असून यापुढे आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकार आढळून आल्यास गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तसेच आढावा बैठकीत कोविड व अन्य कामकाजाविषयी चर्चा झाली. खरेदी खत, वारस हक्क नोंदी, सातबारा दुरुस्ती या कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मंचरचे मंडलाधिकारी यांच्या विषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व कंत्राटदारांचे साटेलोटे झाल्यामुळे रस्त्यांच्या कामाविषयी संशय निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या सर्व कामांची गुणवत्ता विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देखील वळसे पाटील यांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे परंतू इतर कामांकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तालुका पातळीवर विविध शासकीय समित्यांच्या आढावा बैठका घेण्याचे व प्रशासन गतिमान होण्यासाठी प्रांताधिकारी यांनी काम करावे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चक्री वादळाने नादुरुस्त झालेल्या अंगणवाड्या, शाळा यांची दुरुस्ती करावी. आदिवासी भागातील बेघर झालेल्या कुटुंबाना मदत होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भात रोपांचे नुकसान झाले आहे अन्य ठिकाणी भात रोपे असल्यास ती उपलब्ध करून द्यावीत. कृषी व महसूल खात्याने संयुक्त पंचनामे करावेत. क्रीडा संकुल परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याठिकाणी पोलीस गस्त वाढवून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

या आढावा बैठकीस शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता व्ही. आर. नाईक, एच. एस. नारखेडे, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कृषी अधिकारी टी. के. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. चंदाराणी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपअभियंता एल. टी. डाके, एन. एन. घाटूळे आदी उपस्थित होते.

Previous articleसौदी अरेबिया अडकलेल्यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी केलेले पाठपुराव्याला यश
Next articleगुप्तधन मिळवून देतो असे सांगून भोंदूबाबाने केली दिड लाखाची फसवणूक ; घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल