मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

अमोल भोसले,पुणे

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. या हल्ल्यावेळी प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुंबईवरील हल्ल्यावेळी मुंबई पोलिस व सुरक्षा दलांनी केलेला दहशतवाद्यांचा मुकाबला हा गौरवशाली इतिहास आहे. त्या हल्ल्यावेळी मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. प्राणांची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून अजमल कसाबसारखा आत्मघातकी पथकातील दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशाच्या रक्षणासाठी बजावलेले कर्तव्य, केलेला सर्वोच्च त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचे हौतात्म्य सर्वांना देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, हॉटेल ताज व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही एकजुटता, देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या त्याग, कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दहशतवादी हल्यातील शहिद पोलिस वीरांना श्रद्धांजली वाहत असताना मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी शहरासाठी सातत्याने केलेला त्याग तसेच ‘कोरोना’ संकटकाळात बजावलेल्या कामगिरीचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. ‘कोरोना’शी लढताना प्राण गमावलेल्या पोलिस बांधवांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद वीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचे पोलिस दल आधुनिक शस्त्रास्त्र, संपर्क यंत्रणा तसेच शारिरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल. मुंबई पोलिसांचे मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिल दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Previous articleटपाल कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप;भविष्यात देशव्यापी मोठे आंदोलन करण्याचा इशारा
Next articleलस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं