प्रशासनाला मदत करुन सहकार्य करण्याचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे -कीर्ती कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपल्या गावातून कोरोना महामारीचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून शासन व प्रशासनाला मदत करुन सहकार्य करण्याचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांचे उदघाटन करताना केले.

यावेळी पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, झोनल ऑफिसर सी.डी.अद्वैत , प्रशासक निकेतन धापटे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बबनराव दिवेकर, उपप्राचार्य बी.आर.भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, भगवान जाधव या मान्यवरांसह शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र महा सर्वेक्षण कार्यक्रम सद्या राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात आज एकाच दिवशी सुमारे सहाशे सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या उरुळी कांचन गावातील सुमारे ७५४० कुटुंबाच्या यादी प्रमाणे ४५० सेक्टर मध्ये २५६२३ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले यामध्ये ३९९ नागरिकांना १२ ठिकाणी सुरु केलेल्या ओपीडी सेंटरमध्ये तपासणी करण्यास पाठविले त्यापैकी १७७ जण संशयित सापडले त्यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या असता त्यातील ४२ जण कोरोना पॉसिटीव्ह सापडले त्यापैकी १५ जणांना कोरोना केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून,२७ जणांनी होम कोरंटाईन होणे पसंत केले असल्याची तसेच या ४२ जणात २३ उरुळी कांचन मधील,४ कोरेगांव मूळ येथील, १० कुंजीरवाडी येथील,शिंदवणे,सहकारनगर व पारगांव येथील प्रत्येकी १ आणि बोरी ऐंदी येथील २ रुग्ण आहेत अशी माहिती प्रशासक निकेतन धापटे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस व आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली.

या सर्वेक्षणात डॉ.समीर ननावरे, डॉ.रवींद्र भोळे, डॉ.संतोष कथले, डॉ. संतोष गाडे , डॉ.विनोद धीवार, डॉ.परिमल परदेशी, डॉ.शरद गोते, डॉ.संतोष राठोड,डॉ.अनिल निगडे, डॉ.सुनील गांगुर्डे, डॉ.गणेश आखाडे या स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतः हजर राहून आपल्या दवाखान्यात रुग्णांच्या तपासण्या करुन सहकार्य केले.

आज ४२ जण पॉझिटिव्ह सापडल्याने उरुळी कांचन मधील कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा आज उच्चांक स्थापित झाला. उरुळी कांचन गावात कोरोना संसर्गाचा फैलाव जोमाने होत असताना नागरिक, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, अन्य छोटे मोठे व्यावसायिक गांभीर्याने काळजी घेताना दिसत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आले.

शिवाय आज महा सर्वेक्षण होणार असल्याने व्यावसायिकांनी स्वेच्छेने आपले व्यवसाय बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे सकाळी ११ पर्यंत व्यापाऱ्यांनी बंद ठेवून प्रतिसाद दिला पण काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीने दुकानदारांना भडकावून दुकाने चालू करण्यास भाग पाडल्याने काही काळ सर्वेक्षणात विस्कळीतपणा आला होता, तसेच काही शिक्षक,अन्य कर्मचारी यांनी प्रशासनाला ठेंगा दाखवत काही कुटुंबांचे सर्वेक्षण केलेच नाही.

Previous articleनिर्मलाताई पानसरे यांच्याकडून पत्रकारांना ‘कोरोना सुरक्षा किट’ चे वाटप
Next articleकृषिकन्या हर्षदा कोकणेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन