वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी

Ad 1

शिक्रापुर / प्रतिनिधी

पुणे शहरालगत असलेल्या वाघोली गावाचे झपाट्याने नागरीकरण होत असल्याने वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश करावा अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वाघोली गावाचे झपाट्याने नागरीकरण होत असून गावची लोकसंख्या सुमारे दोन लाखाच्या आसपास आहे येथील नागरिकांना पिण्याचे पाणी, घनकचरा, सांडपाणी, जलनिःसारण,वीज यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहे त्यामुळे वाघोली गावाचा पुणे महानगर पालिकेत समावेश करावा अशी मागणी पवार यांनी केली आहे.
अशोक पवार यांनी २०२० मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी वाघोली गावाच्या समस्येविषयी लक्षवेधी सूचना विधिमंडळात मांडली होती त्याला उत्तर देताना वाघोली हे गाव पुणे महानगरपालिका समाविष्ट करणेबाबत अथवा वाघोली, मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक सह पुर्व भागासाठी दुसरी महानगरपालिका करण्यात यावी काय याबाबत विचार सुरू असून सरकार प्रयत्नशील आहे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आपण या मांडलेल्या भूमिकेबद्दल अग्रक्रमाने निर्णय घ्यावा अशी विनंती आमदार अशोक पवार यांनी अजित पवार यांना केली आहे.

….. ………. …….
प्रतीक्षेत असलेल्या हद्दीजवळच्या २३ गावांना पालिकेत समाविष्ट करून घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सकारात्मकता दाखवली आहे. या गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे महापालिकेचे विभाजन करण्यास मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता. पुणे ही राज्यातील ‘अ’ वर्ग दर्जाची महापालिका आहे. स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास तिला ‘क’ दर्जा मिळेल. त्यामुळे आवश्‍यक निधी मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. ही गावे घेण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच ३४ गावे पालिकेत घेण्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले असून, ११ गावांची केवळ अधिसूचना काढली आहे. त्यामुळे या निर्णयासाठी महापालिकेची परवानगी घेण्याची आवश्‍यकता नसल्याने शासनाला केवळ अधिसूचना काढावी लागणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये याअगोदर जी गावे घेतली गेलीत त्यांचा विकास झालेला नाही यामुळे वाघोली गाव महानगरपालिकेत न घेता स्वतंत्र नगरपालिका किंवा नगरपरिषद निर्माण करावी यामुळे वाघोली गावाचा विकास करण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.

राजेंद्र सातव (मा: उपसरपंच वाघोली)