रेटवडी,वाकळवाडी, वरुडे रस्त्याचे सर्वेक्षण

राजगुरुनगर– खेड तालुक्यातील पुर्व भागांतील प्रलंबित असलेल्या रेटवडी,वाकळवाडी,वरुडे रस्त्याच्या कामाचा लवकरच नारळ फुटणार असून वाकळवाडी येथील प्रसिद्ध शिवालया कडे जाणाऱ्या रस्त्याचे कनिष्ठ अभियंत्याकडून सर्वेक्षण करण्यात आले.


खासदार डाॅ.अमोल कोल्हे, आमदार दिलिपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सूचनेवरुन पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री योजनेचे कनिष्ठ अभियंता बाळकृष्ण कोळेकर यांनी स्वत: पायी चालत या रस्त्याचे आज सूक्ष्मसर्वेक्षण केले.रेटवडी ते वरुडे या अंदाजे दहा किलोमीटर नियोजित रस्त्याचे पंतप्रधान सडक योजनेंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.


गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवालया कडे जाणाऱ्या रस्त्याचे सर्वेक्षण हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल कारण एकीकडे गणेशाचे आगमन तर दुसरीकडे अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याच्या कामाची मुहूर्तमेढ लवकरच रोवणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा निर्मला पानसरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या कामाची छबी त्यांनी अशा कामातून दाखवून दिल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे

यावेळी त्यांच्यासमवेत अॅड.सुखदेवतात्या पानसरे, शिक्षकनेते धर्मराज पवळे, रेटवडीचे उपसरपंच नवनाथ पवार, वन समितीचे अध्यक्ष शिवरामशेठ काळे, विविध कार्य.सोसायटीचे चेअरमन शिवाजी वाबळे, खेड तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष किरण पवार, कृषि अधिकारी पंडीत वाबळे, शामराव पवळे, युवानेते योगेश रेटवडे, दत्तात्रय पवळे, गणेश कोरडे, तुषार कोरडे, संतोष पवळे, विशाल भगत, विष्णू (तात्या) वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रेटवडीच्या पाटाच्याशेजारी बैलगाडा घाटाने वाळकेश्वर मंदिराकडे जाणारा इजिमा (इतर जिल्हा मार्ग) नोंद असणार्‍या परंतु दुर्लक्षित अशा या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास रेटवडी, वाकळवाडी, वरुडे यांसह पुर्व भागातील नागरिकांची दळणवळणाची चांगली सोय होणार आहे. वाकळवाडीच्या शिवतीर्थ वाळकेश्वर शिवभक्तांनाही उत्तम पर्यायी रस्ता यानिमित्ताने उपलब्ध होऊ शकणार आहे.अशा भावना जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी व्यक्त केल्या.

Previous articleवाघोलीचा महापालिकेत समावेश करावा आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी
Next articleरेटवडी,वाकळवाडी, वरुडे रस्त्याचे कनिष्ठ अभियंत्याकडून सर्वेक्षण