जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी नारायणगाव येथे खैरे दाम्पत्यावर गुन्हा दाखल

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करून तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपावरून नारायणगावातील कनिका कपिल खैरे व त्यांचे पती कपिल चंद्रकांत खैरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा (ॲट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पुणे नाशिक महामार्गावरील पुनम हॉटेल जवळील विघ्नहर संकुल, नारायणगाव येथे राहणाऱ्या राजश्री नंदू कांबळे (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याच सोसायटीत राहणारे कपिल चंद्रकांत खैरे व त्यांची पत्नी कनिका हे शनिवारी दिनांक २४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विघ्नहर संकुल च्या पार्किंग मध्ये गाडी लावत होते. यावेळी गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून तेथील रहिवासी अलका कवडे व कपिल खैरे यांच्यात वाद झाला. यामुळे कपिल खैरे यांनी अलका कवडे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली याचवेळी येथील रहिवासी सोनाली काळे व संबंधित घटनेच्या फिर्यादी राजश्री कांबळे यांनी त्यांच्यात चाललेली भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कपिल खैरे व त्यांची पत्नी कनिका यांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून तसेच धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिली.

ही घटना घडत असताना तेथे प्रगती नवले, विद्या गुरुवे, योगिता जाधव, अलका कवडे, सोनाली काळे, हेमलता बढे व रोहिणी क्षीरसागर हे गप्पा मारत होते. यावेळी खैरे दांपत्यांनी त्यांच्या समक्ष वरील प्रकार केला. अशा आशयाची तक्रार राजश्री कांबळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली. या कारणावरून खैरे दांपत्यावर जातिवाचक शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर हे करत आहेत.
दरम्यान यापूर्वी देखील खैरे दांपत्य व स्थानिक रहिवासी तसेच गाळेधारक यांच्यामध्ये वाद विकोपाला जाऊन प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले होते.

Previous articleलोणी भापकर येथे पोलीस भरती, इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार : श्री काळभैरव नाथ मंदीर, स्वच्छता अभियान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
Next articleकुरकुंभ ब्रिज खाली ५५वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला